
मुंबई : महिला उद्योजक घडविण्याचे व त्यांना सक्षम करण्याचे कार्य भारतीय महिला उद्योजक संघटना (COWE) या संस्थेकडून करण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेस शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मुंबईत भारतीय महिला उद्योजक संघटना (COWE) महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन उद्योगमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील महिलांना औद्यगिक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी लाभणार आहे.
त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास संस्थेच्या संस्थापिका पी. सौदामिनी, संस्थेच्या राज्याध्यक्षा अश्विनी पाबळे, असोसिएशन ऑफ फुड सायन्टीस्ट ॲण्ड टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. प्रबोध हळदे, एनएसआयसीचे प्रादेशिक सहव्यवस्थापक आर.ए. बीरवा, डी टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपा भाजेका आदीसह महिला उद्योजक उपस्थित होत्या.
देसाई म्हणाले की, भारतीय महिला उद्योजक संघटना देशातील इतर राज्यात यशस्वीरित्या काम करीत असून औद्योगिक परिषद, अभियांत्रिकी पार्क, कर्ज मेळावे असे विविध उपक्रम संस्था राबवित आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि बळकटीकरणासाठी विविध उद्योग उभारणीचे काम करणारी संस्था आता राज्यातही काम करणार आहे. राज्यातील महिलांना औद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी लाभणार आहे. खाद्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग करण्यास वाव असून जे खाद्यपदार्थ जास्त काळ टिकू शकतात, अशा पदार्थांचा वापर करून विविध खाद्यपदार्थ बाजारात आणावेत. याचबरोबर बदलत्या जीवनशैलीनुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहेत. मात्र या क्षेत्राशी संबंधित हार्डवेअर वस्तूंचे उत्पादन त्या तुलनेने कमी आहे. या हार्डवेअर उत्पादनाच्या क्षेत्रातही महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
विविध वस्तुंचे उत्पादन देशात करून येथेच उद्योग केल्यास भारतीय अर्थकारण अधिक मजबूत होण्यास सहकार्य लाभणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
















