मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष करून विविध उत्सव व सणांच्या काळात कोविड प्रतिबंधाबाबत नागरिकांनी आत्यंतिक काळजी घ्यावी. तसेच कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंनी आणि कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तिंनी तातडीने आपली कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्याव्यात.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील ज्या २६० चाचणी केंद्रांवर कोविड विषयक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येते, त्या केंद्रांचे पत्ते महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षांशी (Ward War Room) संपर्क साधल्यानंतर देखील आपल्या नजीकच्या चाचणी केंद्राचा पत्ता मिळू शकतो. कोविडचे वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता नागरीकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे मास्क वापरणे, सुरक्षित आंतर राखणे आणि वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी केले आहे. कोविड विषयक मोफत वैद्यकीय चाचणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २६० पेक्षा अधिक चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. कोविड चाचणी वेळेत झाल्यास संबंधित बाधित व्यक्तीला वेळेवर उपचार मिळण्यासह त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्यास प्रतिबंध होऊ शकेल, असेही श्री. काकाणी यांनी आवर्जून नमूद केले आहे.
‘कोविड – १९’ या साथरोगाच्या प्रसारास आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने विविध स्तरीय उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाय योजनांचा एक प्रमुख भाग आहे, तो म्हणजे कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांचा ! बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करण्याची कार्यवाही व व्यवस्थापन सातत्याने अधिकाधिक प्रभावीपणे करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२० पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘कोविड – १९’ या संसर्गजन्य रोगाची बाधा झाल्याचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. ज्यामुळे सदर बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो. हीच बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन कोविड विषयक चाचणी करून घेण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने जनजागृती करीत आहे. तसेच महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या २६० पेक्षा अधिक चाचणी केंद्रांवर (नमुना संकलन केंद्रांसह) या चाचण्या पूर्णपणे मोफत स्वरूपात करण्यात येत आहेत. ही केंद्रे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये कार्यरत आहेत.
त्याच बरोबर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये देखील या चाचण्या निर्धारीत शुल्क आकारून करण्यात येत आहेत. या सर्व चाचण्यांचे निकाल हे चाचणीचा निकाल आल्यापासून २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे गरजेचे आहे.
कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या या कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी किंवा बाधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविड चाचणी करवून घ्यावी. तसेच सण उत्सवांच्या निमित्ताने किंवा अन्य कारणांमुळे बाहेरगावी जाऊन परतलेल्या व्यक्तींनी आपली कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी. ज्यामुळे वेळीच निदान झाल्यामुळे वेळच्या वेळी औषध उपचार मिळण्यासह संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवल्यामुळे त्या व्यक्ती पासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. तरी या अनुषंगाने कोविड विषयक वैद्यकीय चाचणी वेळच्या वेळी करवून घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईकर नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोविड-१९ विषाणू सुसंगत वर्तन राखावे. मास्कचा उपयोग करावा. हातांची नियमित स्वच्छता राखावी. सुरक्षित अंतर राखावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोणत्याही कोविड-१९ बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास अथवा कोणत्याही प्रकारचे लक्षण स्वतःमध्ये आढळून आल्यास त्वरेने कोविड-१९ चाचणी करून घ्यावी.
तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना सहव्याधी आहेत (उदाहरणार्थ फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार, मधुमेह, मेंदूविकार, रक्तदाब) अशा व्यक्तींनी आणि प्रसूतीकाळ नजीक असलेल्या गर्भवती माता, डायलिसिस रुग्ण, कर्करूग्ण इत्यादी जोखीम गटातील नागरिकांनी योग्य ती अधिकाधिक काळजी घ्यावी, असे देखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.