मराठा समाजाच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची चर्चा
मुंबई, विशेष प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली, त्यावेळी ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्यशासन सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून प्रयत्न केले जातील. यावेळी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह विविध प्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा आदी उपस्थित होते.