संपूर्ण जग यावेळी कोरोनोसारख्या गंभीर संकटाशी लढत आहे; संपूर्ण जगात मानवजातीवर संकट ओढावले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात एवढे देश प्रभावित झाले नव्हते जेवढे आज कोरोनामुळे झाले आहेत त्यामुळे अनेकांना मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागत आहे व हेच ओळखून वैद्यकीय तज्ञाकडून यावर कशी मात करावी याबाबत काही सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मनोविकार तज्ञ डॉ ओंकार माटे सांगतात, ” मानसिक ताणतणाव समजून घेताना आपल्या मेंदूचे कार्य समजून घेणे महत्वाचे आहे. आपला मेंदू बाहेरील घटकांकडून मिळणारी माहिती ग्रहण करतो तसेच योग्य त्या माहितीची निवड करणे, आवश्यक ती माहिती साठवून ठेवणे, ती दुसऱ्याला देणे, त्या माहितीची शहानिशा करून विकसित करत असतो; अशा या साध्या सोप्या प्रक्रियांवर आपली मानसिक संतुलन व ताणतणावाची अवस्था आकार घेत असते.
धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगामध्ये सौम्य नैराश्य, उदासिनता याप्रकारची सर्वसाधारण मानसिक अनारोग्याची समस्या अनेक लोकांना भेडसावत असते यामध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीची भर पडली असून या कठीण काळामध्ये नागरिकांनी आपले मानसिक आरोग्य निरोगी ठेवणे फारच महत्वाचे आहे. सध्या केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारतर्फे कोरोना सारख्या जीवघेण्या संकटावर मात करण्यासाठी २१ दिवसाची संचारबंदी लागू केली असून देशातील सर्व नागरिकांना घरीच राहावे लागणार आहे. या काळामध्ये नागरिकांनी आपले मानसिक आरोग्य निरोगी ठेवणे फार महत्वाचे असून या कालावधीत मानसिक ताणतणाव टाळणे खूप गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी योग, मेडिटेशन, घरातल्या घरात व्यायाम, बैठे -खेळ यासोबतच घरातील व्यक्तींशी सुसंवाद करणे फार महत्वाचे आहे. लॉक डाउन झाले म्हणून तुम्ही स्वतःला मनाचे लॉकडाउन करू नका, आज उपलब्ध असलेल्या माहिती तंत्रज्ञानाद्वारे आपल्या नातेवाईकांशी तसेच जुन्या मित्रमंडळींशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला एकटे वाटणार नाही, यासोबतच स्वतः चे व आपल्या भविष्याचे अवलोकन करण्यास ही संधी तुम्हाला मिळाली आहे व या संधीचा उपयोग करून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या कुटुंबीयांशी सल्ला मसलत करून योग्य ते नियोजन करू शकता”
आजच्या आधुनिक युगामध्ये माहिती तंत्रज्ञानांचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज एक व्यक्ती हजारो लोकांच्या संपर्कात आहे व एका चुकीच्या संदेशामुळे अथवा अफवेमुळे अनेक समस्या निर्माण होऊन शासकीय यंत्रणेवर भार येण्याचा धोका अधिक असतो. सोशल मीडियावर आलेले संदेश अथवा सूचनांची खात्री करूनच त्यावर विश्वास ठेवा व या २१ दिवसाच्या कालावधीत सोशल मीडियापासून दूर राहिलात तरी चालेल फक्त महत्वाचे फोन कॉल्स व संदेश यापुरता आपला मोबाईल सिमीत ठवणे गरजेचे आहे कारण सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक नागरिकांमध्ये एककेंद्री वृत्ती वाढत असल्याची तक्रार यापूर्वी आली आहे अशी माहिती बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ डॉ प्रतीक सुरंदशे यांनी दिली.