नाशिक, 14 मे : कोरोना योद्ध्यांना सुरक्षा साधने , 50 लाखाचा विमा, 25000 रुपये दरमहा प्रोत्साहन भत्ता तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी जीडीपीच्या 5./.टक्के खर्च करावा, आरोग्य सेवेचे खासगीकरण बदला करा, या मागण्यासाठी सीटूच्या वतीने आज देशभरात सुरक्षा मागणी दिवस पाळण्यात आला.
तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेचे खाजगीकरणाचे धोरण बंद करावे आणि मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सुविधा वर पाच टक्के खर्च करावा, अशी मागणी आजच्या आंदोलनातून करण्यात आली. सीटूच्या वतीने या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले .केंद्र व राज्य सरकारने या मागण्यांचा विचार करून तातडीने निर्णय करावेत अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी एल कराड आणि राज्य सरचिटणीस एम एच शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निमित्ताने कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी व कामगारानी काळ्या फिती लावून व हातात फलक घेऊन काम केले. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, धुळे, पुणे ,मुंबई अनेक जिल्ह्यात आशा, कर्मचारी ,अंगणवाडी कर्मचारी ,औषध उद्योगातील कामगार ,औद्योगिक कामगार तसेच नागरिकांनी या आंदोलनात भाग घेतला.

कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे व हा धोका किमान वर्षभर सुरू राहील असे डब्ल्यूएचओने जाहीर केले आहे. त्यामुळे ही प्रदीर्घ लढण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, किचन कामगार ,नगरपालिका ग्रामपंचायती महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी, पाणी- विद्युत -मालवाहतूक -औषधी निर्माण अशा अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कामगार कर्मचारी अधिकारी तसेच आशा अंगणवाडी अशा योजना कर्मचारी, पोलीस ,पॅरामिलिटरी सैनिक हे सर्वजण जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा साधने, आवश्यक तेथे पीपीई, 50 लाखाचा विमा , प्रोत्साहन भत्ता हे देणे आवश्यक आहे. अन्यथा ही लढाई आपण जिंकू शकणार नाही.,असा इशारा सिटूने निवेदनात दिला आहे.