मुंबई, विशेष प्रतिनिधी- मुंबईत २४ तासांत ८१३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २८४५०२ झाली असून एकूण मृतांचा आकडा १०८७१ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी शुक्रवारी दिवसभरात १०१५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २५९१३७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या १२९२६ अॅक्टीव रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
धारावीत रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दिवसभरात फक्त एकच नवीन रुग्ण आढळला. येथील रुग्णांची संख्या ३७१६ झाली आहे. यातील आतापर्यंत ३३८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धारावीत २५ सक्रिय रुग्ण आहेत. तर दादरमध्येही दिवसभरात १५ नवीन रुग्ण सापडले. येथील रुग्णांची संख्या ४६३२ झाली आहे. मात्र यातील ४२८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या येथे १७१ अॅक्टीव रुग्ण आहेत. माहिममध्ये ०९ नवीन रुग्ण सापडले असून येथील रुग्णांची संख्या ४४०४ वर पोहचली आहे. मात्र यातील ३९८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथील अॅक्टीव रुग्ण २७३ आहेत.