रत्नागिरी, प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील वाघ्रट गावचे सुपूत्र, उद्योजक ऋषीनाथ तथा दादा पत्याणे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आज सोमवारी रत्नागिरी नगर परिषदेच्या स्मशानभूमीसाठी सुमारे 25 टन इतके लाकूड मोफत देण्यात आले. कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांची अंत्यसंस्कारावेळी परवड होऊ नये या सामाजिक जाणीनेतून ही लाकडे देण्यात आली.
लांजा तालुक्यातील वाघ्रट गावचे सुपुत्र असलेले मुंबईस्थित उद्योजक ऋषीनाथ तथा दादा पत्याने यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या संस्थेने स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकी जपली आहे. गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिला लाटेतही स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत दादा पत्याणे यांनी वाघ्रट पंचक्रोशीतील परप्रांतीय मजूर तसेच अनेक स्थानिक गोरगरीब जनतेला अन्नधान्याच्या माध्यमातून मदत केली होती.
सद्यस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत मृत्यू होणाऱ्या नागरिकांवर, लोकांवर रत्नागिरी नगर परिषदेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता जाणवत होती. ही गोष्ट समजल्यानंतर दादा पत्याणे यांनी आपल्या स्वराज्य प्रतिष्ठानचे माध्यमातून व स्वखर्चातून रत्नागिरी परिषदेच्या स्मशानभूमीसाठी मोफत 25 टन लाकडे देण्याचा संकल्प सोडला होता.
त्यानुसार सोमवारी वाघ्रट येथून सुमारे 25 टन लाकडे घेऊन दोन वाहने रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली. या कार्यक्रमा प्रसंगी स्वतः स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषीनाथ तथा दादा पत्याणे यांच्यासह त्यांचे सुपूत्र नितीश पत्याणे, बंधू सुनील पत्याणे, प्रमिल पत्याणे, संतोष पत्याने, पुनस गावचे सरपंच इलियास बंदरी, विनोद सावंत, सुभाष जाधव, कोट उपसरपंच नंदकुमार आग्रे, रवींद्र पाष्टे, चांदोर गावचे पोलीस पाटील प्रवीण मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेलार, हे देखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुनस गावचे सरपंच इलियास बंदरी यांनी ऋषीनाथ तथा दादा पत्याणे आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. दादा पत्याणे यांच्याप्रमाणेच समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन कोरोनाच्या संकटात गोरगरीब लोक व शासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.