मुंबई – महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले असून या परिस्थितीचा सामना करताना अनिश्चितता आणि असहाय्यतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेली किंवा न जाणवलेली अशी काहीशी विलक्षण परिस्थिती आपण सर्वचजण अनुभवत आहोत व यामुळे नैराश्य वाढत असून याचा थेट संबंध नागरिकांच्या मानसिक ताणतणावामध्ये दिसून येत असल्याचे निरीक्षण नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे करण्यात आले आहे . टाळेबंदीमुळे आमच्या सामाजिक आचरणामध्ये देखील संपूर्ण बदल झाला आहे. कामकाजाच्या प्रक्रियेत बदल आणि यापूर्वी रूढ नसलेली घरून काम करण्याची नवीन संकल्पना आता सर्वसाधारणपणे नित्याची झाली आहे. व्यसनाधीनता आणि मद्यपान देखील लक्षणीय वाढले आहे. थोडक्यात, या सर्व परिस्थितीमुळे संघर्ष, नवीन समायोजन, एकटेपणा आणि समजून घेण्यासंबंधीचे मुद्दे यात वाढ झाली आहे व हे सर्व करताना कळत नकळत मानसिक ताणतणावात वाढ होत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मनोविकार तज्ञ डॉ ओंकार माटे म्हणाले . ” सध्याची परिस्थितीत मानसिक आरोग्य सांभाळणे ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. कोरोना संक्रमणात विलगीकरण आणि तत्सम प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी झालेल्या एका निरिक्षणावरून आम्हाला असे आढळून आले आहे की अलगीकरणामुळे पीडित व्यक्तींमध्ये नैराश्य, चिंताग्रस्त विकार, स्वभावात बदल, चिडचिडेपणा, गैरसमज, स्वयंनियंत्रणाचा अभाव बऱ्याच प्रमाणात आढळतो. त्यामुळे कोरोनाग्रस्त नागरिकांमध्ये दीर्घकाळ टिकणार्या मानसिक-तणावाची लक्षणे आढळतात, यासोबतच आम्हाला असे आढळून आले आहे की २० ते ४० वयोगटातील नागरिकांमध्ये सर्वात जास्त नैराश्याचे प्रमाण आहे . कारण हा वयोगट सर्वात जास्त क्रियाशिल मानला जातो परंतु गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम अथवा घरूनच शिक्षण तसेच बेरोजगारीमुळे त्रासला आहे. भारत हा युवा देश असल्याचे आपण नेहमीच बोलत आलो आहोत व आजमितीला कोरोनाच्या संक्रमणामुळे आपल्या युवा शक्तीचा ऱ्हास होताना दिसत आहे अर्थात हे सर्व थोड्या काळासाठी असले तरी याचा परिणाम दीर्घ काळासाठी होणार आहे.
सोशल आयसोलेशनमुळे अनेकांचा इतरांशी संपर्क तुटला आहे आणि भविष्यात पूर्वीसारखे नातेसंबंध जोडता येतील का, अशी काळजी त्यांना वाटते. काही जणांनी स्वतःच स्वतःला इतरांपासून दूर करून घेतलं आहे. म्हणजे त्यांनी एकटेपणा स्वतःहून ओढावून घेतला आहे. त्यामुळे भविष्यात ही साथ गेल्यानंतर ते पुन्हा लोकांमध्ये मिसळतील का, याबाबत शंकाच आहे. या कठीण काळात युवा पिढीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समाज माध्यमांचा योग्य वापर झाला पाहिजे तसेच आजच्या युवकांना आशावादी बनविणे फार गरजेचे आहे यासाठी राजकारण , समाजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचं आहे.”
कोव्हिड-१९ च्या या काळात आपल्यापैकी अनेकांची अँक्झायटी (चिंता) थोडी वाढली आहे. मात्र, काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत किंवा त्यात वाढ झाली, यापूर्वी आलेल्या जागतिक साथी आणि आणीबाणीच्या प्रसंगांचासुद्धा लोकांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. २००३ साली सार्सची साथ आली होती. त्यावेळी ६५ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्यांमध्ये ३० टक्क्यांची वाढ दिसून आली होती. एचआयव्ही रोगाचे संशोधन झाल्यावरही अनेकांनी वैद्यकीय रिपोर्ट न काढता आत्महत्या केल्या होत्या, तसेच अर्थव्यवस्थाच जेव्हा ढेपाळते तेव्हा येणाऱ्या आर्थिक असुरक्षिततेमुळेसुद्धा मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो व हाच परिणाम येत्या काळात आपल्याला दिसणार आहे अशी माहिती मनोविकार तज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी दिली. याविषयी सविस्तर सांगताना अमेरिकेतल्या मेरिलँड इथल्या सेंटर फॉर स्टडी ऑफ ट्रॉमॅटिक स्ट्रेसचे सहसंचालक जोशुआ सी. मॉर्गनस्टेन म्हणतात, “ऐतिहासिकदृष्ट्या कुठल्याही आपत्तीचा अनेकांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा तो जास्त काळ टिकतो. इतिहासातून काही शिकण्यासारखं असेल तर ते हेच की संसर्गजन्य आजाराची साथ गेल्यानंतरही त्याचा मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम टिकून राहतो.”