
मुंबई, (नवनाथ मोरे) : केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्यांचे सरकार आहे. डाव्या पक्षांवर भाजप आणि संघ परिवाराकडून नेहमीच आरोप आणि टीका केली जाते. परंतु, अखेर भाजपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये कशा प्रकारे कोरोनाविरोधात लढत आहे, हे समजले आणि त्यातूनच चक्क महाराष्ट्रातील भाजपाच्या विरोधी पक्ष नेत्याने डाव्या पक्षांचे, कोरोनाविरोधात उत्तम उपाययोजना केल्या म्हणून कौतुक केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोरोना रोखण्यासाठी केरळ सरकारने प्रभावी उपाययोजना केल्या, असे म्हटले आहे.
प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी कोरोनाविरोधात नुसते लढणार्याच नव्हे तर कोरोना आटोक्यात यावा म्हणून यशस्वी प्रयत्न करणार्या केरळ सरकारचे म्हणजेच पर्यायाने डाव्या पक्षांचे देशसेवेचे कार्य महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडले आहे.
प्रवीण दरेकर यांनी केरळ आणि महाराष्ट्र सरकार यांची तुलना केली. ते म्हणाले की, कोरोनोचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र व केरळ मधील रुग्णसंख्या समान होती पण आज महाराष्ट्रामध्ये कोरोना रोखण्याच्या दृष्टीने ठोस व प्रभावशाली नियोजनाच्या अभावामुळे महाराष्ट्र कोरोनो मुळे अधिक धोक्यात आला आहे. मुंबई सह मालेगाव, औरंगाबाद आदी भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ते आटोक्यात आणण्यासाठी आपण अन्य राज्यांपेक्षा कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून देताना दरेकर यांनी सांगितले की, केरळ व महाराष्ट्रात १५ मार्च रोजी कोरोनाचे २४ रुग्ण होते. पण आज ३० एप्रिल अखेर केरळ मध्ये त्यांच्याकडे ४९७ रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात हाच आकडा १० हजार ४९८ इतका झाला आहे, आपण जवळपास १० हजार ने पुढे गेलो आहोत . कोरोना रोखण्यासाठी केरळ सरकारने प्रभावी उपाययोजना केल्या. अर्थसंकल्पाच्या तुलनेत आरोग्यावर त्यांनी सुमारे ५.५ टक्के इतका खर्च केला आहे तर आपण फक्त ४ टक्के खर्च केले. त्यांच्याकडे मृतांचा आकडा केवळ ४ असून आपल्याकडे ४३२ म़ृत पावले आहेत. ९ मार्च रोजी केरळ ने कोरोनाला रोखण्यासठी २७ मोठ्या रुग्णालयांमध्ये ४० खाटांचे विलिगीकरण कक्ष तातडीने तयार केले व २० हजार कोटीचे पॅकेज १९ मार्चला दिले. अश्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राने घेतली असती तर राज्यात कोरोनोचे वाढते प्रमाण निश्चितच कमी झाले असते, असा दावा दरेकर यांनी केला.















