कोल्हापूर : कोरोना ड्युटीवरील शिक्षकांच्या अडचणी त्वरित दूर कराव्यात, अशी मागणी एमफुक्टो (महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ)चे राज्य उपाध्यक्ष प्रा. डाॅ. सुभाष जाधव यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना साथीत राज्यातील विविध जिल्ह्यांत शिक्षकांना ड्युटी देण्यात आली आहे. परंतु त्या संदर्भात अनेक गंभीर अडचणी निर्माण झाल्याआहेत. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात असूनही शिक्षक काम करीत आहेत. असे काम करताना शिक्षकाना कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामळे वरिष्ट प्रशासनाने शिक्षकांच्या अडचणीकडे तातडीने लक्ष देण्याची व त्या दूर करण्याची गरज आहे, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले आहे.
ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगावचे शिक्षक एस.एच.कोळी यांना रेशनिंग दुकानावर ड्युटी असताना कोरोनाची लागण होऊन निधन झाले आहे. कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या सांगलीचे प्राथमिक शिक्षक नानासो कोरे यांना आपले कर्तव्य बजावत असताना सिमेंट ने भरलेला एक ट्रक चेक नाक्यावर न थांबता भरधाव डफळापुर कडे निघून गेला. सदर शिक्षकांनी एक ऑपरेटर सह चार किलोमीटर सदर ट्रकचा पाठलाग केला. डफळापुर पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या उताराजवळ सदर ट्रक समोर गेले असता ट्रकखाली चिरडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडत आहे, तसेच शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
या संदर्भात खालील मागण्याची पुर्तता करण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती वर्षा गायकवाड यांच्याकडे केली गेली आहे.
- ड्युटीवर असलेल्या शिक्षकांवर केली जाणारी मनमानी त्वरित थांबवा.
- शिक्षकांना सदर काम करण्या संबंधी लेखी पत्र द्यावे. त्यांमध्ये कामाचे स्वरूप, सर्वांना कामाचे समान तास आणि कोणते अधिकार आहेत ते स्पष्ट केले पाहिजे.
- कोरोना ड्युटीवरील सर्व शिक्षकांना सुरक्षितता कीट देण्यात यावे.
- सदर शिक्षकांना आपले काम करण्यासाठी कामाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांंची ( बैठक व्ययवस्था, सावली, पाणी) पुर्तता करण्यात यावी.
- प्रत्येक चेक पोस्टवर शिक्षकांसोबत किमान एक पोलीस कर्मचारी असलाच पाहिजे.
- सदर शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे.
- कोरोना साथीत ड्युटी बजावत असताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावी.
- शिक्षकांना केलेल्या कामाचे प्रमाणपत्र द्यावे.