मुंबई, दि. २१ :- डहाणू (जि. पालघर) तालुक्यातील शिरसोन पाडा येथे पाण्याच्या टाकीवरून पडून जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलींचा मृत्यू व एक मुलगी जखमी झाली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन मुलींच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत देण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीचे काम केलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी दिली.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर साकोरे यांनी सांगितले की, या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली असता पाण्याचा टाकीचा प्लॅटफॉर्म कमकुवत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात
दोषी असलेल्या एका कंत्राटी अभियंत्याची सेवा समाप्त तर उप विभागीय अभियंता यांच्यावर प्रशासकीय कारवाई आणि कार्यकारी अभियंता यांची चौकशी करण्यात येत आल्याचेही त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा संदर्भात राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले, जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत असलेल्या ५६२ नळ पाणी पुरवठा योजनांपैकी १५२ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून उर्वरित ४१० नळ पाणी पुरवठा योजनांची कामे विविध टप्प्यावर प्रगतीपथावर आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या २६ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी एक योजनेचे काम पूर्ण झाले असून २५ नळ पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या २६ योजनांची कामे वेगवेगळ्या ६ कंत्राटदारांमार्फत करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेली ५६२ योजनांची कामे वेगवेगळ्या ११० कंत्राटदारांमार्फत करण्यात येत आहेत.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील ५२ गावातील पाणी पुरवठाबाबत देखभाल दुरुस्ती व्यवस्थापन महामालिकेमार्फत करण्यात येत आहे. तसेच उर्वरित ग्रामीण क्षेत्रातील १७ गावांसाठी जिल्हा परिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिकेचे प्रतिनिधी मिळून संयुक्त समिती स्थापन करावी व या योजना कार्यान्वित करून जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर साकोरे यांनी सांगितले.
या संदर्भात सदस्य राजेंद्र गावित यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती