रत्नागिरी, प्रतिनिधी : काँग्रेसचे रत्नागिरीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आज आपल्या पदाचा पदभार काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकारला. रत्नागिरीतील काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या काँग्रेसभवन येथे हा सोहळा पार पडला. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलफे, जिल्हा प्रभारी मनोहर शिंदे, ॲड.सुजित झिमण, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, रमेश शहा, जिल्हा सरचिटणीस संजय उर्फ बाळा मयेकर, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, चिपळूणचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी शहर अध्यक्ष राकेश चव्हाण, राजापुरचे नगराध्यक्ष जमीर खलफे आदी मान्यवर उपस्थित होते.
पदग्रहण सोहळ्याच्या सुरूवातीलाच दिवंगत माजी जिल्हाध्यक्ष ॲड.विजय भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश लाड यांचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे सांभाळेन. काँग्रेस पक्ष भक्कम करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवूनच सर्वांनी कामाला लागले पाहिजे. तुम्हा सर्वांची साथ असेल तरच मी उत्तम काम करू शकतो. यापूर्वी जसे काँग्रेसमध्ये चालत होते ते यापुढे चालणार नाही. पद मिळाल्यावर उगवणारे व पद गेल्यावर गायब होणारे आपल्याला चालणार नाहीत. कार्यकर्त्याला उभे करण्याची जबाबदारी माझी आहे. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल. राज्यात महाविकास आघाडी आहे. परंतु आमचा मान-सन्मान आम्हाला मिळाला नाही तर मी आघाडी आहे हे पाहणार नाही असा इशारा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सत्ताधारी पक्षांनाच दिला आहे.














