
रत्नागिरी, (आरकेजी) : नारायण राणे यांनी काॅग्रेसला रामराम ठोकल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील काॅग्रेस पुरती पोरकी झालेली पहायला मिळाली. आज नोटबंदी विरोधात काॅग्रेसने आंदोलन पुकारले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात हे आंदोलन होताना केवळ हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच कार्यकर्ते पहायला मिळाले.
मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाला आज वर्ष पुर्ण झालं. या निर्णयामुळे बँकांच्या रांगेत पैसे काढण्यासाठी उभे असलेल्या 100 हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच जीएसटी, महागाई, बेरोजगारी, कर्जमाफी आदी अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसकडून आज काळा दिवस पाळण्यात येत असून सरकारच्या विरोधात राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात आले. रत्नागिरीतही काँग्रेसकडून आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चाला विधानपरिषद आमदार हुस्नबानू खलीपे यांच्यासह काही पदाधिकारी आणि जिल्ह्यातील मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत नवीन पक्षाची स्थापना केली आहे. ते काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर रत्नागिरीतलं काँग्रेसचं हे पहिलं आंदोलन होतं. मात्र या आंदोलनाला केवळ काही ठराविक कार्यकर्तेच उपस्थित होते. घोषणाबाजी करत या काॅग्रेस कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या विरोधातला माहोल बनवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र नारायण राणे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व नसल्याने मोर्चात निरुत्साह दिसत होता.