मुंबई, विशेष प्रतिनिधी:- काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व. अहमद पटेल, आसामचे माजी मुख्यमंत्री स्व. तरुण गोगोई आणि माजी मंत्री स्व. प्रा. जावेद खान रूपाने काँग्रेसने आपली तीन अनमोल रत्न गमावल्याची खंत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केली. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसतर्फे संयुक्त आदरांजली वाहण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
स्व. अहमद पटेल हे काँग्रेसचे एक निष्ठावान, राजकारणाचा गाढा अनुभव असलेले व काँग्रेसच्या विचारांशी नेहमीच एकनिष्ठ असलेले राजकारणी होते. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनितीकार म्हणून त्यांची ओळख होती. ते तीन वेळा लोकसभा सदस्य व पाच वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. त्यांच्या राजकारणातील अनुभवाचा काँग्रेस पक्षाला नेहमीच फायदा झाला. ते काँग्रेस पक्षाचे चाणक्य म्हणून ओळखले जायचे. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विविध पदांवर अहमद पटेल यांनी काम केले व काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले.
तरुण गोगोई यांच्या बद्दल सांगायचे झाले, तर ते काँग्रेस पक्षाचे एक सच्चे, निष्ठावंत नेते होते. सर्वाना एकत्र घेऊन पुढे जाण्याची कला त्यांना अवगत होती. आसामचे तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी राज्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. आसाम मध्ये शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. ईशान्य भारतातील आतंकवाद कमी करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आसामच्या प्रगतीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
माजी मंत्री स्व. प्रा. जावेद खान हे काँग्रेसचे जनतेशी घट्ट नाळ जोडलेले नेते होते. विनम्रपणे जनतेच्या समस्यांमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून, त्यांचे निराकरण करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. विनम्रपणा हा त्यांचा गुण सर्वांनी घेण्यासारखा आहे. या तिन्ही महान नेत्यांच्या आत्म्यांना ईश्वरचरणी शांती लाभो हीच प्रार्थना, या शब्दांत एकनाथ गायकवाड यांनी श्रद्धांजली वाहिली.
या श्रद्धांजली सभेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या समवेत माजी आमदार व मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र बक्षी, काँग्रेसचे ऑल इंडिया मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष व स्व. प्रा. जावेद खान यांचे सुपुत्र नदीम जावेद व त्यांचे बंधू तसेच माजी मंत्री वसीम खान, माजी मंत्री अनिस खान, माजी आमदार बाबा सिद्दीकी, मुंबई काँग्रेस मायनोरिटीसेलचे अध्यक्ष बब्बू खान, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, मुंबई काँग्रेसचे कार्यालयीन सचिव राजेश भाई ठक्कर, मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झिया उर रहमान, मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.