२५ सप्टेंबर २०२१ हा कॉम्रेड प्रभाकर संझगिरी यांचा जन्मशताब्दी दिन. २५ सप्टेंबर १९२१ रोजी त्यांचा जन्म झाला आणि ९ मार्च २००९ रोजी ते आपल्याला सोडून गेले. १९४१ साली वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी ते कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले. आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यामध्ये तब्बल ६८ वर्षे त्यांनी कम्युनिस्ट चळवळीची अविरत सेवा केली.
यातील बहुसंख्य काळ ते पक्षाचे व सीटूचे आघाडीचे नेते राहिले. पक्षाचे राज्य सेक्रेटरी व केंद्रीय कमिटी सदस्य, सीटूचे राज्य अध्यक्ष व राज्य सरचिटणीस आणि अखिल भारतीय उपाध्यक्ष, ‘जीवनमार्ग’चे संपादक, विधानसभा व विधानपरिषदेत पक्षाचे आमदार, आणि एक प्रतिभाशाली मार्क्सवादी विचारवंत अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी दीर्घ काळ समर्थपणे सांभाळल्या. मार्क्सवाद-लेनिनवादावरील त्यांची डोळस निष्ठा अखेरपर्यंत अढळ राहिली.
*मोलाचे वैचारिक योगदान*
महाराष्ट्रातील डाव्या चळवळीला कॉ. संझगिरींचे सर्वात मोलाचे योगदान एक प्रतिभाशाली मार्क्सवादी विचारवंताच्या रूपात राहिले. ‘अणुच्या अंतरंगात’, ‘मानवाची कहाणी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – एक मार्क्सवादी मूल्यांकन’ आणि ‘चार्वाक ते मार्क्स’ ही त्यांनी लिहिलेली पथदर्शक पुस्तके महाराष्ट्रभर तर गाजलीच, शिवाय त्यापैकी अनेक पुस्तकांचा भारतीय भाषांमध्ये अनुवाद होऊन ती देशभर पोहोचली. या पुस्तकांतील प्रत्येक विषयाचे त्यांनी अत्यंत सर्जनशीलरीत्या मार्क्सवादी दृष्टीकोनातून विश्लेषण केले. त्यातून समकालीन डाव्या कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण तर त्यांनी केलीच, शिवाय येणाऱ्या पिढ्यांसाठीही एक अमोल ठेवा ते सोडून गेले.
१९८९ ते २००८ अशी दोन दशके पक्षाचे मुखपत्र ‘जीवनमार्ग’चे संपादकपद त्यांनी समर्थपणे सांभाळले. त्यांचे अग्रलेख आणि ‘प्रासंगिक परामर्श’ हे सदर अतिशय लोकप्रिय झाले. सोपे, नेमके पण मार्मिक लिखाण ही कॉ. संझगिरींच्या लेखनशैलीची खास वैशिष्ट्ये होती. हा दोन दशकांचा काळ जगातील, देशातील व राज्यातील अनेक मोठ्या स्थित्यंतरांचा आणि आव्हानांचा काळ होता.
१९८९ ते १९९१ या काळात आधी पूर्व युरोपमध्ये व नंतर सोव्हिएत युनियनमध्ये समाजसत्तावादाचे विघटन झाले. १९१७च्या रशियातील महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीनंतरच्या ७४ वर्षांत जगातील समाजसत्तावादी चळवळीवर झालेला तो सर्वात मोठा आघात होता. भांडवली विचारवंतांनी लगेच ‘मार्क्सवाद संपला, समाजवाद बुडाला’ अशी कोल्हेकुई सुरू केली आणि ‘इतिहासाचा अंत’ व ‘विचारसरणीचा अंत’ झाल्याचे जाहीर करून टाकले. या वैचारिक हल्ल्याचा जगातील अनेक कम्युनिस्ट पक्षांवर विपरीत परिणाम होऊन काहींनी तर आपल्या नावांतून ‘कम्युनिस्ट’ हा शब्दच काढून टाकला.
अशा गंभीर परिस्थितीत जानेवारी १९९२ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची १४वी कॉंग्रेस (अखिल भारतीय अधिवेशन) चेन्नई येथे भरली व तिने ‘काही वैचारिक प्रश्नांसंबंधी’ हा कळीचा ठराव करून मार्क्सवादाचे ठामपणे रक्षण करतानाच सोव्हिएत युनियन आणि पूर्व युरोपातील समाजसत्तावादाच्या ह्या ऱ्हासाचे सखोल विश्लेषण केले. पण त्यापूर्वीच व त्यानंतरही कॉ. संझगिरींनी ‘जीवनमार्ग’ मध्ये अनेक प्रगल्भ वैचारिक लेख व अग्रलेख लिहून मार्क्सवादाची वैधता खंबीरपणे उचलून धरली आणि ख्रुश्चेवपासून ते गोर्बाचेव्हपर्यंतच्या दुरुस्तीवादाचे व विसर्जनवादाचे अचूक विश्लेषण करून त्यावर जोरदार वैचारिक प्रहार केले. कॉ. संझगिरींचे त्या काळचे लिखाण आजही मार्क्सवादाच्या अभ्यासकांना आणि कार्यकर्त्यांना अतिशय उद्बोधक व संग्राह्य ठरते.
याच काळात भारतात दोन मोठी आव्हाने निर्माण झाली. एकीकडे १९९१ साली कॉंग्रेस सरकारने साम्राज्यवादी जागतिकीकरणाच्या नवउदारवादी धोरणांचे उद्घाटन करून देशातील आर्थिक-सामाजिक विषमता वाढवली आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाला ग्रहण लावले. सध्याच्या भाजपच्या केंद्र सरकारने अर्थातच तीच धोरणे खूप पुढे नेली आहेत आणि संपूर्ण देश देशीविदेशी कॉर्पोरेट शक्तींना कवडीमोलाने विकायला काढला आहे. त्याविरुद्धच परवा २७ सप्टेंबरचा ‘भारत बंद’ देशातील कोट्यवधी जनतेने यशस्वी केला आहे.
दुसरीकडे अयोध्येच्या राम मंदिरासाठीची देशव्यापी मोहीम चालवून, ६ डिसेंबर १९९२ रोजी (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच!) बाबरी मशिदीचा विध्वंस करून आणि जातीय दंगलींचा आगडोंब पेटवून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप या धर्मांध व मनुवादी शक्तींनी आपला प्रभाव वाढवला. त्यातच १९९२-९३च्या मुंबईतील भीषण धर्मांध दंगली पेटवून शिवसेनेने देशभर पेटलेल्या आगीत तेल ओतले. हजारो निरपराध लोक देशभरातील या दंगलींत मारले गेले. मनुवादाच्या वाढत्या प्रभावामुळे उच्च जातीवर्गांकडून दलित, आदिवासी आणि महिलांवर होणारे अत्याचार अनेकपट वाढले. अशा धर्मांध व जातीय ध्रुवीकरणाच्या परिणामी १९९५ साली महाराष्ट्रात आणि १९९८ साली देशात भाजप व त्याचे मित्रपक्ष सत्तेवर आले.
फेब्रुवारी-मार्च २००२ मध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चिथावणीने गुजरातचा भयानक धर्मांध नरनारीसंहार झाला. २००० हून अधिक स्त्री-पुरुष आबाल-वृद्धांचे अत्यंत अमानुषपणे शिरकाण करण्यात आले. फाळणीनंतरचा भारतातील हा सर्वात भीषण धर्मांध हिंसाचार होता. तेच नरेंद्र मोदी हे आज देशाचे पंतप्रधान आहेत यापेक्षा जास्त लाजिरवाणी बाब दुसरी कोणती होऊ शकते?
या दोन्ही कळीच्या राजकीय आव्हानांचे कॉ. संझगिरींनी ‘जीवनमार्ग’मध्ये केवळ विश्लेषणच केले नाही, तर त्यावर त्यांनी त्वेषाने हल्ला चढवला आणि या आव्हानांचा बिनतोड प्रतिकार करण्यासाठी संघर्षरत होण्याचे पक्षाला, डाव्या चळवळीला आणि जनतेला आवाहन केले.
भारतातील जातिव्यवस्था हा कॉ. संझगिरींच्या व्यासंगाचा आणखी एक खास विषय होता. त्यावर त्यांनी सखोल अभ्यास व चिंतन केले होते. कॉ. बी.टी. रणदिवे यांनी ‘जाती, वर्ग आणि मालमत्ता संबंध’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहून या प्रश्नाला हात घातला होता. कॉ. ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांनीही जातिप्रश्नाचा सखोल अभ्यास करून त्याविषयी विपुल लेखन केले होते. महाराष्ट्रात कॉ. आर. बी. मोरे यांनी या प्रश्नाविषयी महत्त्वाचे तात्विक आणि व्यावहारिक योगदान केले होते. हे सर्व चिंतन पुढे नेऊन महाराष्ट्रातील पक्षाचा व डाव्या चळवळीचा या प्रश्नावरील दृष्टीकोन योग्य मार्क्सवादी दिशेने बदलण्याचे मुख्य श्रेय कॉ. संझगिरींना जाते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – एक मार्क्सवादी मूल्यांकन’ आणि ‘चार्वाक ते मार्क्स’ या दोन्ही पुस्तकांमध्ये तसेच कॉ. आर.बी. मोरे यांच्या कॉ. सत्येंद्र मोरे यांनी लिहिलेल्या चरित्राच्या प्रस्तावनेमध्ये या विषयावर त्यांनी मौलिक लेखन केले आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नाचाही कॉ. संझगिरींनी सखोल अभ्यास केला होता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर अनेक थोर स्त्री-पुरुषांच्या पुरोगामी वारशाचे मार्क्सवादी दृष्टिकोनातून विश्लेषण करून हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य महाराष्ट्रातील पक्षाने व डाव्या चळवळीने केले पाहिजे यावर कॉ. संझगिरींचा भर असे. काही महिन्यांपूर्वी कॉम्रेड्स उदय नारकर आणि अजित अभ्यंकर यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्राचे दीपस्तंभ’ ही मालिका त्याच दृष्टीने पक्षाने महिनाभर फेसबुकवर चालविली होती, आणि तिचे पक्षाबाहेरही व्यापक स्वागत झाले होते.
‘चार्वाक ते मार्क्स’ची दुसरी सुधारित आवृत्ती, गेल्या तीन शतकांतील महाराष्ट्राचा सूत्ररूपी इतिहास, धर्म आणि जातिव्यवस्थेवर पुस्तक आणि महाराष्ट्रातील पक्ष शिबिरांचा अभ्यासक्रम या चार बाबी पूर्ण करण्याची कॉ. संझगिरींची तीव्र इच्छा मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अपुरी राहिली.
*कम्युनिस्ट पक्षाचे नेते*
पण कॉ. संझगिरी हे केवळ मार्क्सवादी विचारवंत कधीच नव्हते. “मार्क्सवाद हे प्रत्यक्ष कृतीसाठी मार्गदर्शन आहे” हा लेनिनचा सिद्धांत त्यांनी पूर्णतः आत्मसात केला होता.
म्हणूनच १९४०च्या दशकात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे कार्यकर्ते या नात्याने साम्राज्यवादविरोधी भारतीय स्वातंत्र्यलढयात ब्रिटिश सार्जंटसच्या लाठ्याकाठ्या खाऊन त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती होती. पण एम. एससी. पदवी मिळताच मार्क्सवादाच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता होणे पसंत केले. त्यानंतर ते कधीच मागे वळले नाहीत.
पुढे गिरणी कामगारांचे संपलढे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ (त्या आव्हानात्मक काळात ते अविभक्त कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई कमिटीचे सेक्रेटरी होते), गोवा मुक्ती आंदोलन, दुरुस्तीवादाविरुद्धचा कडवा पक्षांतर्गत संघर्ष, १९६२ ते १९६६ या साडेतीन वर्षांच्या काळात राज्यातील व देशातील अनेक कम्युनिस्ट नेत्यांप्रमाणेच भोगलेला तुरुंगवास, शिवसेनेविरुद्धचा प्रतिकारलढा, भांडुप परिसरात सीटू-प्रणीत कामगार चळवळीची मुहूर्तमेढ, सिएट कामगारांचे अटीतटीचे विजयी संपलढे, बीड आणि पुणे जिल्ह्यांत शेतकरी-शेतमजुरांचे लढे, आणीबाणीविरुद्धचा संघर्ष, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा सामाजिक लढा, विधानसभेत व नंतर विधानपरिषदेत पक्षाचे प्रतिनिधित्व, दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन, जमिनीच्या प्रश्नावर सत्याग्रह, भाडेकरू कृती समितीची स्थापना व आंदोलने, ‘जनशक्ती सहकारी पतपेढी’ची स्थापना, जागतिकीकरण व धर्मांधताविरोधी मोहिमा, एनरॉनची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यासाठी झालेला संयुक्त संघर्ष, डाव्या व धर्मनिरपेक्ष पक्षांच्या एकजुटीसाठी केलेले अथक प्रयत्न अशा अनेकानेक संघर्षात व मोहिमांत कॉ. संझगिरी आघाडीवर राहिले. आपल्या आयुष्याची साडेपाच वर्षे त्यांनी तुरुंगवासात घालवली.
कॉ. एस. वाय. कोल्हटकर १९६४ ते १९८३ या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पहिले महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी होते. १९८३ ते १९८६ या काळात कॉ. अहिल्या रांगणेकर पक्षाच्या राज्य सेक्रेटरी होत्या. त्या आजवर देशभरात पक्षाच्या एकमेव महिला राज्य सेक्रेटरी असाव्यात. डोळ्याच्या विकाराच्या कारणास्तव त्या राज्य सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्या. १९८६ साली कॉ. प्रभाकर संझगिरींची पक्षाचे राज्य सेक्रेटरी म्हणून निवड झाली.
जानेवारी १९९१ मध्ये नाशिकला भरलेले पक्षाचे राज्यस्तरीय संघटना प्लीनम हा त्यांच्या नेतृत्वाखालील एक महत्त्वाचा पुढाकार होता. पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस कॉ. ई.एम.एस. नंबुद्रीपाद आणि सध्याचे सरचिटणीस कॉ. सीताराम येचुरी हे त्यास हजर होते. नाशिक प्लीनमचे खास योगदान म्हणजे त्याने पक्षातील साचलेपणाला जबाबदार असलेली ऐतिहासिक कारणमीमांसा उलगडून दाखविली आणि त्यातून पक्षकार्यात योग्य ते बदल करण्याची निकड स्पष्ट केली. ‘मागील इतिहासाचा वारसा’ या विभागात ह्या संघटनात्मक प्लीनमने पुढील मार्गदर्शन केले.
“सारांश, पक्षाच्या जुन्या इतिहासाकडे नजर टाकली, तर शेतकरी चळवळ उभारण्याकडे दुर्लक्ष, जातीप्रश्नाची उपेक्षा, कामगारवर्गातील भांडवलदारी राष्ट्रीय प्रवृतींवर मात करण्यात अपयश, खुद्द पक्षात दुरुस्तीवादाचे प्राबल्य, अशा काही महत्त्वाच्या वैगुण्यांमुळे पक्ष संयुक्त असतानाच त्याचा विकास खुरटलेला होता. महाराष्ट्राच्या जुन्या वारशात ह्या ज्या त्रुटी होत्या त्या समजून जाणीवपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न, मार्क्सवादी म्हणून वेगळे झाल्यावरही, आपल्याकडून झालेला नाही…..अखेरची गोष्ट म्हणजे गेली काही वर्षे पक्षाच्या कार्याचा भर निवडणुका आणि संयुक्त आघाड्यांवर राहिला आहे. ही गोष्ट परिस्थितीला धरून असली तरी त्याला पक्षाचे स्वतंत्र कार्य व लढे आणि राजकीय-वैचारिक प्रचार यांची सतत जोड नसेल तर त्यातून पक्षशिस्त, कणखर क्रांतिकारी बाणा व जिद्द जोपासणीला मदत होत नसते, हे लक्षात ठेवले पाहिजे.” नंतरच्या काळात ही वैगुण्ये दूर करण्याचे नक्कीच प्रयत्न झाले, पण अजून बरेच काही करणे बाकी आहे.
२००५ पर्यंत कॉ. संझगिरी यांनी पक्षाचे राज्य सेक्रेटरीपद समर्थपणे सांभाळले. वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव सोलापूरच्या राज्य अधिवेशनात ते त्या पदावरून निवृत्त झाले. पक्षाचे शिक्षक म्हणून महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना मार्क्सवादी दृष्टीकोनातून घडवण्यात कॉ. संझगिरींचे मोठे योगदान होते. राज्यभर त्यांनी अनेक उद्बोधक शिबिरे घेतली आणि एक नवी मार्क्सवादी पिढी तयार केली. कॉम्रेड्स बी. टी. रणदिवे, एस. वाय. कोल्हटकर, शामराव परुळेकर, गोदावरी परुळेकर, एल. के. ओक, पी. बी. रांगणेकर, डॉ. ए. बी. सावंत, कृष्णा खोपकर, गंगाधर अप्पा बुरांडे, नरेंद्र मालुसरे, आणि त्याचबरोबर कॉम्रेड्स एल. बी. धनगर, लहानू कोम, कुमार शिराळकर व डॉ. किशोर ठेकेदत्त अशा अनेक नेत्यांचेही पक्ष शिक्षणाच्या कार्यात मोठे योगदान राहिले आहे. आज इतर अनेक कॉम्रेड्स ते कार्य पुढे नेत आहेत.
*कामगार-शेतकरी एकजुटीचे नेते*
आधी आयटक, मग सीटू आणि एकूणच कामगारवर्गीय चळवळीचे नेते म्हणून कॉ. संझगिरींनी आयुष्यभर योगदान केले आणि भांडुपच्या प्रबळ सीटू केंद्राची (मुंबई श्रमिक संघ) त्यांनी मोठ्या कष्टाने उभारणी केली. ते पुढे सीटूचे राज्य सरचिटणीस व नंतर राज्य अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष अनेक वर्षे राहिले. महाराष्ट्राला कामगार नेत्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. कॉम्रेड्स बी. टी. रणदिवे, एस. ए. डांगे, एस. एस. मिरजकर, एम. के. पंधे, एस. वाय. कोल्हटकर, पी. के. कुरणे, के. टी. सुळे, मदन फडणीस, कृष्णा खोपकर, के. एल. बजाज, के. एल. मलाबादे, बी. पी. कश्यप, महेंद्र सिंह, उद्धव भवलकर असे पहिल्या दोन तीन पिढ्यांतील प्रमुख कामगार नेते होऊन गेले.
पण कॉ. संझगिरींचे वैशिष्टय हे होते की, त्यांना शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांचीही चांगली जाण होती. १९९२ साली ‘किसान आघाडीवरील कार्ये’ हा ठराव त्यांनी लिहून तो पक्षाच्या राज्य कमिटीसमोर चर्चेसाठी मांडला, तेव्हा किसान-शेतमजूर आघाडयांवर काम करणाऱ्या अनेक राज्य कमिटी सदस्यांनी व्यक्त केलेले आश्चर्य मला अजूनही आठवते. पक्षाच्या केंद्रीय कमिटीच्या या विषयावरील ठरावांसोबतच या ठरावातूनही महाराष्ट्रातील किसान व शेतमजूर आघाडयांना योग्य ती दिशा मिळाली.
दुष्काळ, जमीन, पाणी, वीज, रेशन, रोजगार, कर्ज या ज्वलंत प्रश्नांवरील चळवळींना चालना देऊन कॉ. संझगिरींनी जनतेच्या लोकशाही क्रांतीचा कणा असलेल्या कामगार-शेतकरी एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केलेच, पण आणखी एका महत्त्वाच्या निर्णयातून देखील त्यांनी ते व्यक्त केले. ग्रामीण महाराष्ट्रातील पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या मानधनासाठी सीटू-संलग्न मुंबई श्रमिक संघातर्फे दरवर्षी पक्षाच्या राज्य कमिटीला एक मोठी रक्कम देणगी म्हणून देण्याचा स्वागतार्ह पायंडा त्यांनी अनेक वर्षांपूर्वी पाडला व तो आजही अविरत सुरू आहे. महाराष्ट्रातील इतर समृद्ध ट्रेड युनियन केंद्रांनी त्याचे अनुकरण केले तर त्याचा चळवळीला मोठा उपयोग होईल. कामगार-शेतकरी-शेतमजूर एकजुटीच्या आपल्या उद्दिष्टाला त्यामुळे एक मूर्त हातभार लागेल.
कॉ. संझगिरींनी प्रचंड परिश्रमांतून बांधलेल्या त्यांच्या आवडत्या भांडुप केंद्रात कार्यकर्त्यांचा समर्थ संच घडविण्यात त्यांचा अर्थातच सिंहाचा वाटा आहे. कॉम्रेड्स सईद अहमद, मदन नाईक, हेमकांत सामंत, डॉ. विवेक मोंटेरो, डॉ. एस. के. रेगे, के. आर. रघु, पी. एम. वर्तक, सगीर अहमद, अली अहमद, आदिनाथ तिवारी, डी. आर. सिंग, सुगंधी फ्रान्सिस, आरमायटी इराणी, आकाश बागुल, दिवंगत अंबादास नेरकर, दिवंगत शंकर कणसे व इतर अनेक नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा त्यांत समावेश आहे.
*काही व्यक्तिगत आठवणी*
४३ वर्षांपूर्वी १९७८ साली मी पक्षात आल्यानंतर पहिली सात-आठ वर्षे कॉ. संझगिरींशी माझा फारसा परिचय नव्हता. तेव्हा त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र भांडुप परिसर असायचे. पक्षाच्या राज्य सचिवमंडळाच्या बैठकीसाठी ते ‘जनशक्ती’त येत असत. खरं सांगायचं तर तेव्हा मला कॉ. संझगिरींची आदरयुक्त भीतीच वाटायची!
१९८६ साली ते पक्षाचे राज्य सेक्रेटरी झाल्यावर आणि १९८७ साली माझी राज्य कमिटीवर निवड झाल्यावर त्यांच्याशी माझा जास्त संबंध येऊ लागला. विद्यार्थी-युवा आघाडीमध्ये असताना आमच्या राज्यस्तरीय शिबिरांमध्ये ‘मार्क्सवाद म्हणजे काय?’, ‘महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक जडणघडण’ अशा विषयांसाठी आम्ही त्यांना शिक्षक म्हणून हमखास बोलावत असू. शिबिरे घेण्याच्या त्यांच्या शैलीवर विद्यार्थी-युवा कार्यकर्ते खुष असायचे, कारण त्यांना प्रत्येक वेळी काहीतरी नवनवे शिकायला मिळत असे आणि तेही सहज समजू शकेल अशा सोप्या भाषेत. महाराष्ट्रभर पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांची पिढी अशा नियमित शिबिरांतून घडविण्यास मोठी मदत झाली. कॉ. संझगिरींनी व इतर नेत्यांनी त्या काळात घेतलेल्या अनेक उत्कृष्ट अभ्यास शिबिरांची मी लिहून घेतलेली टिपणे अजूनही जपून ठेवली आहेत.
१९८९ साली ‘जीवनमार्ग’चे ते संपादक झाले तेव्हा दिवसभर पक्ष व ट्रेड युनियनचे कार्य केल्यानंतर कॉ. संझगिरी व कॉ. सुमनताई संध्याकाळी ‘जनशक्ती’वर येत असत आणि रात्री उशिरापर्यंत ‘जीवनमार्ग’चे लिखाण करीत असत. तेव्हा सत्तरी ओलांडलेल्या कॉ. संझगिरींचा कामाचा उरक पाहून मला आश्चर्य आणि कौतुक वाटत असे. त्यांच्यावरील भार थोडा तरी कमी करावा या उद्देशाने तेव्हापासून मी त्यांना ‘जीवनमार्ग’च्या कामात शक्य ती मदत करण्यास सुरुवात केली.
१९९१ साली नाशिकच्या संघटनात्मक प्लीनममध्ये पक्षाच्या राज्य सचिवमंडळावर माझी निवड झाल्यानंतर कॉ. संझगिरींबरोबर जवळून काम करण्याची, त्यांच्यासोबत पक्षकार्यासाठी अनेक जिल्ह्यांना भेटी देण्याची मला संधी मिळाली. त्या सर्व अनुभवांतून त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. विक्रोळीच्या त्यांच्या नव्या घरात ते राहायला जाण्यापूर्वी वर्षभर ते ठाण्यात त्यांचे चिरंजीव अनिरुद्धच्या घरी राहात असत. माझ्या घरापासून ते घर हाकेच्या अंतरावर होते. तेव्हा त्यांनी बोलावले की त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारण्याचे भाग्य मला अनेकदा लाभले. त्यांच्याशी गप्पा म्हणजे एक वैचारिक मेजवानीच असायची. अशा मेजवानीचा आस्वाद महाराष्ट्रातील अनेक कॉम्रेडसनी घेतला आहे.
२००५ साली ते निवृत्त होऊन पक्षाच्या राज्य सेक्रेटरी पदाची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर पुढील चार वर्षे ते असेपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांचे मार्गदर्शन मी घेत असे. विक्रोळीच्या त्यांच्या घरी त्यांच्याशी राजकीय चर्चा करण्यासाठी, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी अनेकदा जात असे. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो कार्यकर्ते व कामगारांसोबत त्यांना अखेरचा लाल सलाम देण्यासाठी आम्ही सर्व जण अर्थातच उपस्थित होतो.
कॉ. संझगिरींची साधी राहणी, संयमी स्वभाव, लढाऊ बाणा, अफाट व्यासंग, कामाचा दांडगा उरक आणि कार्यकर्त्यांविषयीची आस्था हे गुण आपण सर्वांनीच घेण्यासारखे आहेत. अखेरच्या चार-पाच वर्षांत त्यांची प्रकृती नाजूक असतानाही त्याबद्दल तक्रार त्यांनी कोणाकडेही कधीच केली नाही.
कॉ. संझगिरींच्या असामान्य जीवनकार्यात त्यांच्या सहचारिणी व कॉम्रेड असलेल्या सुमनताईंचा अतिशय मोलाचा वाटा होता यात काहीच शंका नाही. तसेच त्यांची मुले व त्यांच्या कुटुंबियांची भक्कम साथही कॉ. संझगिरींना नेहमीच लाभली.
गेल्या दीड दोन दशकात देशाचे आणि महाराष्ट्राचे जवळजवळ सर्व ज्येष्ठ व नेतृत्वदायी कॉम्रेड्स काळाच्या पडद्याआड गेले आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेली, ब्रिटिश आणि कॉंग्रेस सरकारचा तुरुंगवास भोगलेली, कडव्या वैचारिक पक्षांतर्गत संघर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारी, आणि मार्क्सवाद-लेनिनवाद व कम्युनिस्ट पक्षावर अढळ निष्ठा असलेली ही पिढी आज जवळजवळ लोप पावली आहे. परवाच एका युवा नेत्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेस पक्षात उडी घेऊन ज्या उथळ संधिसाधुपणाचे जाहीर प्रदर्शन केले, त्याबद्दल या जुन्याजाणत्या कम्युनिस्ट पिढीने तीव्र नापसंती व्यक्त केली असती, आणि शहीद भगतसिंगाचे खरेखुरे आदर्श समोर ठेवणारी नवी कम्युनिस्ट पिढी सुद्धा तशीच तीव्र नापसंती व्यक्त करेल यात काही शंका नाही.
जुन्या कम्युनिस्ट पिढीतील अशा अनेक तेजस्वी नेत्यांची उदाहरणे समोर ठेवून, सध्याच्या कॉर्पोरेट धर्मांधतेच्या आव्हानाला प्रभावी टक्कर देण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी अनेक पटीने वाढली आहे. ती ओळखून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व एकूणच डावी लोकशाही चळवळ वाढविण्यासाठी कल्पकतेने, जिद्दीने आणि वज्रनिर्धाराने अथक कार्य करणे हीच या सर्व ज्येष्ठ आणि असामान्य कॉम्रेड्सना आपली खरी आदरांजली ठरणार आहे.
आपल्या सर्वांचे आदरणीय नेते कॉम्रेड प्रभाकर संझगिरी यांच्या स्मृतीला त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने, ‘जीवनमार्ग’च्या संपादक मंडळाच्या वतीने, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आणि महाराष्ट्रातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण क्रांतिकारी लाल सलाम!
कॉम्रेड प्रभाकर संझगिरी अमर रहे!














