कोकणवृत्तविशेष : राज्यात डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजुंच्या संघटना एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. मुंबईतही त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. उद्या २७ फेब्रुवारीला दादर पूर्वे स्थानकाजवळ एसएफआय, डीवायएफआय यांच्यासह डाव्या पुरोगामी संघटना अभाविप आणि भाजपा सरकारविरोधात सायंकाळी साडेपाच वाजता आक्रमक आंदोलन करणार आहेत. तर केरळमधील राज्य सरकारच्या आशीर्वादाने मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते रा.स्व.संघ आणि भाजपाच्या विरोधात हिंसक कृत्य करत आहेत, असा आरोप रा.स्व. संघाने केला आहे. म्हणूनच १ मार्च रोजी संघप्रणित मंचाकडून मुंबईसह देशभरात माकपविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एसएफआय आणि अभाविप या विद्यार्थी संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. ज्यात एसएफआयचे कार्यकर्ते जखमी झाले होते. दिल्लीत आयसा ही डावी संघटना आणि अभाविप यांच्यातही राडा झाला होता. देशभरात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून डाव्या पुरोगामी संघटनांना लक्ष केले जात आहे. विरोधाचा आवाज दडपवून त्यांना देशद्रोही ठरवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. अभाविप सारख्या हल्ले खोरांना अटक करा आणि पुण्यातील अटक केलेल्या एसएफआय च्या कार्यकर्त्यांवर लावलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या, अशी मागणीदेखील उद्या करण्यात येणार आहे.
केरळ मध्ये माकप हा पक्ष भाजपा आणि रा.स्व. संघाविरोधात हिंसक कारवाया करत आहे, तेव्हा केरळचे सरकार बरखास्त करा, अशी मागणी करत डाव्यांविरोधात आंदोलन केले जाणार आहे. तिथे स्वयंसेवकांची हत्या केली जात आहे. हे सरकार मानवता विरोधी आहे, असेही संघाचे म्हणणे आहे. अशीच हिंसा माकप कडून सुरू राहिल्यास डाव्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपाचे राष्ट्रीय सचिव अनिल जैन यांनी दिला आहे.