मुंबई : दिनांक १ सप्टेंबर २०१८ पर्यंत पर्यावरणस्नेही नागरिकांच्या जिल्हानिहाय समित्या नियुक्त करून १३ कोटी वृक्ष लागवडीत लागलेल्या वृक्षांचे दर सहा महिन्यांनी ऑडिट केले जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी वन सचिव विकास खारगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.राज्यातील जनतेने उद्दिष्टाच्या चार दिवस आधीच १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्णत्वाला नेला आणि आपण पर्यावरणस्नेही असल्याचे दाखवून दिले असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात दुपारी चार वाजेपर्यंत १४ कोटी ७१ लाख ८८ हजार ४१७ वृक्ष लागले. यात ३६ लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले. लोकसहभागातून वृक्षलागवडीचा विषय वनसत्याग्रहात रुपांतरित व्हावा हा हेतू सफल झाला. आता लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे हे प्राणवायू घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे दायित्व आहे. तेही नक्कीच पूर्णत्वाला जाईल.वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात पारदर्शकता यावी यासाठी लावलेल्या प्रत्येक रोपाची अक्षांश-रेखांशासह नोंद घेण्यात आली आहे. ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध असल्याचेही वनमंत्र्यांनी सांगितले ते म्हणाले की यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला असून यासाठी नागपूर येथे कमांड रूम विकसित करण्यात आली आहे. लावलेल्या वृक्षांची दर सहा महिन्यांनी (३१ ऑक्टोबर/ ३१ मे) पाहणी होईल आणि त्याची अद्ययावत माहिती पुन्हा नव्याने पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.राज्यात वृक्षलागवड लोकचळवळ झाली असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, पहिल्या वर्षी २ कोटीचा संकल्प २ कोटी ८२ लाख वृक्ष लावून तर ४ कोटी चा संकल्प ५ कोटी ४३ लाख वृक्ष लावून पूर्णत्वाला गेला. या दोन्ही वृक्षलागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. प्रधानमंत्री महोदयांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातूनही त्याचे कौतुक केले. भारत सरकारच्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये वन आणि वनाशी संबंधित चार क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिले आले. यात जलव्याप्त वन क्षेत्र, कांदळवन संवर्धन, वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन आणि बांबू लागवडीचा समावेश आहे. पुढचे लक्ष ३३ कोटी वृक्ष लागवडीचे आहे. आतापर्यंत ज्याप्रमाणे राज्यातील आबालवृद्धांनी वृक्षलागवडीत सहभाग नोंदवला आणि हे मिशन आपले स्वत:चे आहे असे मानून ते पूर्णत्वाला नेले, त्याप्रमाणेच आता चांदा ते बांदामधील सर्व नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा आणि ३३ कोटी वृक्षलागवडीचे मिशनही यशस्वी करावे. या वृक्षलागवडीचे नियोजन ३ ऑगस्ट २०१८ रोजीच्या जिल्हाधिकारी यांच्यासमवेतच्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सुरु होत आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातच वनाधिकाऱ्यांची पुणे येथे यासाठी परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.प्रत्येक जिल्हाच्या डीपीप्रमाणे टीपी अर्थात ट्री कव्हरेज प्लान तयार करण्यात येणार असून वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी सर्व प्रशासकीय विभागांना अर्धा टक्क्यांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन आराखड्यात नाविन्यपूर्ण योजनांमधूनही यासाठी निधी देण्याची व्यवस्था आहे. आमदार निधीतील २५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम वृक्षलागवड, संवर्धन आणि जनजागृतीसाठी वापरता येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात, शेतबांधावर फळझाड लागवडीची योजना सामाजिक वनीकरण शाखेच्या सहाय्याने रोहयोमार्फत राबविण्यात येत आहे. फलोत्पादनाची मर्यादा ४ हेक्टरवरून ६ हेक्टर एवढी वाढवण्यात आली आहे. रेशीम उद्योगाला चालना मिळावी म्हणून ३३ कोटी वृक्षलागवडीमध्ये साडेसात कोटी वृक्ष तुतीचे लावण्याचे प्रस्तावित आहे. बांबू लागवडीला राज्यात प्रोत्साहन देण्यात येत आहे. बांबू आणि मोहफुलाला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केल्याने यावर आधारित उद्योगांना चालना मिळून रोजगार संधीत वाढ होणार आहे. महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांमध्ये बांबू प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे. ३३ कोटी वृक्षलागवडीत ५ कोटी बांबू लागवडीचे नियोजन आहे. नवीन उज्ज्वला योजनेतून वनवासींना गॅस जोडणी मिळणार असल्याने १५ हजार ५०० गावांना त्याचा लाभ होईल. पर्यायाने वनसंवर्धन होण्यासही मदत होईल. शेतकऱ्यांच्या घरी जन्माला येणाऱ्या कन्येचे स्वागत करताना कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत १० वृक्ष ( पाच फळझाड/ पाच लाकूड देणारे वृक्ष) भेट देण्याची नवीन महत्त्वाची योजना अंमलात आणल्याचेही त्यांनी सांगितले. वनमंत्र्यांनी क्लीन सिटी प्रमाणे ग्रीन सिटी आणि क्लीन व्हिलेज प्रमाणे ग्रीन व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी सर्वांनी यापुढेही हरित महाराष्ट्राच्या मिशनमध्ये सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन यावेळी केले.पत्रकार परिषदेत त्यांनी वन विभागाच्या ग्रीन आर्मी ( ५३ लाख), हॅलो फॉरेस्ट १९२६ ( आतापर्यंत ५२२१५ तक्रारी, सूचना/ माहिती प्राप्त) माय प्लांट मोबाईल ॲप, मराठवाड्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना ( दुसरी इको बटालियन ही मराठवाड्यातच स्थापणार), रॅली फॉर रिव्हर, रोपे आपल्या दारी सारखा उपक्रम अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. वृक्षलागवडीमुळे समाजात निर्माण होत असलेल्या सुचक्रांची माहितीही त्यांनी उदाहरणासहित सांगितली.