मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे माजी सदस्य, शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय नेते कॉ. कुमार शिराळकर यांचे नाशिक येथे आज रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. गेले पंधरा दिवस ते पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. डी. एल. कराड यांच्या इस्पितळात उपचार घेत होते. २०१९ पासून ते कर्करोगाशी झुंज घेत होते. अखेर आज रात्री साडेआठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेल्या कुमार शिराळकर यांनी नोकरीचा त्याग करून तत्कालीन धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आयुष्य झोकून दिले. आपल्या अनेक मध्यमवर्गीय, सुशिक्षित साथीदारांना सोबत घेत आदिवासींची श्रमिक संघटना स्थापन केली. त्याचसोबत ते मागोवा या क्रांतिकारी गटाचे सदस्य होते.
एकूण राजकीय परिस्थितीत प्रभावी हस्तक्षेप करता यावा, यासाठी ते १९८२ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. तेव्हापासून आयुष्याच्या अखेरपर्यंत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियनची धुरा खांद्यावर वाहत राहिले. ते अनेक वर्षे शेतमजूर युनियनचे राज्य सरचिटणीस होते आणि पुढे राष्ट्रीय सहसचिव होते.
श्रमिकांच्या लढ्यासोबतच जातीअंत, स्त्रीमुक्ती, धर्मनिरपेक्षतेचे संरक्षण करण्याच्या लढ्यातही ते अग्रभागी राहिले. खऱ्या अर्थाने धर्म-जात आणि पितृसत्ताक जाणिवांचा त्याग केलेले मार्क्सवादी विचारवंत कार्यकर्ते म्हणून ते सर्वदूर परिचित होते.
वनाधिकार कायद्याची नियमावली बनवण्यासाठी त्यांनी भारतभर पायपीट करून त्या कायद्याच्या अंमलबजावणीत मोठी कामगिरी केली.
आपल्या सक्रिय चळवळीतून वेळ काढून अतिशय कसदार लेखन आणि चिंतन करणारे ते मार्क्सवादी विचारवंत होते. मार्क्स, बुद्ध, म. फुले, डॉ. आंबेडकर यांच्या वैचारिक शिदोरीवर त्यांचा बौद्धिक पिंड जोपासला होता.
आदिवासीपासून नामवंत पुरोगामी विचारवंतांपर्यंत त्यांनी सुह्रदांचे जाळे तयार केले होते. त्यांच्या निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक लढाऊ, सर्वहारा जाणीव पुरेपूर अंगिकारलेला, दूरगामी दृष्टी असलेला विचारवंत नेता गमावला आहे. त्यांची वैयक्तिक सुखाची तमा न करता त्यागी जीवन जगण्याची प्रेरणा आमच्या कार्यकर्त्यांना कठीण परिस्थितीवर मात करण्याचे बळ देईल.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने कॉ. कुमार शिराळकर यांना अखेरचा लाल सलाम!
उदय नारकर, राज्य सचिव
सदर लेख माकपच्या फेसबुक पेजवरून साभार