(सदर लेख ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी लिहिला असून त्यांच्या परवानगीने प्रकाशित. प्रस्तुत लेख दैनिक पुण्यनगरी या दैनिकात प्रसिद्ध झाला आहे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडचा दादरच्या नायगावपासून भायखळ्यापर्यंतचा भाग म्हणजे सारं गिरणगाव. एके काळी तिथं अनेक कापड गिरण्या आणि कामगारांच्या चाळी व घरं होती. या कामगारांची अधिकृत संघटना, राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही काँग्रेसची असली तरी कामगारांचा पाठिंबा मात्र कम्युनिस्ट व समाजवाद्यांना असायचा. पगार, बोनससाठी संप यांच्या नेतृत्वाखाली व्हायचे आणि गिरणी मालक करार करायचे रा. मि. म. संघाशी.
परळ मतदारसंघातून १९६७ च्या विधानसभेत कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कृष्णा देसाई निवडून गेले होते. आधी ते नगरसेवक म्हणूनही निवडून येत. याच काळात शिवसेनेची स्थापना झाली आणि मराठी कामगारांचा अड्डा असलेल्या गिरणगावात शिवसेनेनं पाय पसरायचं ठरवलं. पण त्यात अडथळा होता आमदार कृष्णा देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा.
कृष्णा देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी १९७० च्या जूनमध्ये सहलीला जायचं ठरवलं होतं. त्या तयारीसाठी ५ जूनच्या रात्री एका राइस मिलमध्ये सारे चर्चा करत बसले होते. तेव्हा काही जण देसाईंना भेटायला आले. त्यांच्याशी बोलत आ. देसाई बाहेर गेले. बाहेर खूप अंधार होता. जणू आधीच ठरवून दिवे बंद केले होते. अंधारात त्यातील काही जणांनी आ. देसाई यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला आणि ते पळू लागले. आ. देसाई यांनी मागे धावत जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते मध्येच कोसळले…कधीही न उठण्यासाठी.
दुसऱ्या दिवशी आ. देसाई यांची मोठी अंत्ययात्रा निघाली. अनेक राजकीय पक्षांचे नेते व हजारो कामगार त्यात होते. स्मशानात झालेल्या शोकसभेत कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी या हत्येला शिवसेना, बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री वसंतराव नाईक जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांचे हे आरोप आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठामध्ये जसेचा तसे छापून आले. या हत्येशी आपला संबंध असल्याच्या आरोपाचा ठाकरे यांनी इन्कार केला. मात्र नंतर एका सभेत त्यांनी कम्युनिस्टांना संपवणाऱ्या शिवसैनिकांचा आपणास अभिमान आहे, अशा आशयाचं विधान केलं होतं.
कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या निधनामुळे तिथं विधानसभेची पोटनिवडणूक लागली. ऑक्टोबर १९७० च्या या पोटनिवडणुकीसाठी देसाई यांच्या पत्नी सरोजिनी यांना कम्युनिस्ट पक्षाने तर शिवसेनेने वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली. सरोजिनी देसाई यांच्यासाठी सर्व डाव्या पक्षांचे नेते आणि काँग्रेसचे मोहन धारिया यांनी सभा घेतल्या. वामनराव महाडिक यांच्यासाठी शिवसेनेच्या २८ सभा झाल्या. त्यांपैकी १५ सभेत शिवसेनाप्रमुखांची भाषणं झाली.
निकाल २९ ऑक्टोबर १९७० रोजी लागला. वामनराव महाडिक यांना सरोजिनी देसाई यांच्याहून सुमारे १६०० मतं ज्यादा मिळाली. त्यांच्या रूपाने विधानसभेत व गिरणगावात शिवसेनेचा प्रवेश झाला. आज गिरण्या बंद झालेल्या व कैक कामगार मुंबईबाहेर निघून गेले असले तरी तिथं शिवसेनेचा प्रभाव आहे.
कॉम्रेड देसाई हत्या प्रकरणात शिवसेनेच्याच दिलीप हाटे, अशोक कुलकर्णी व विश्वनाथ खटाटे यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. चांगल्या वर्तणुकीमुळे ते सात वर्षांत सुटले. कृष्णा देसाई मला संपवणार होता, असं विधान काही वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलं. त्यात किती तथ्य होतं कोणास ठाऊक. हत्या तर प्रत्यक्षात कॉम्रेड कृष्णा देसाईंची यांचीच झाली होती.