रत्नागिरी, (आरकेजी) : जीवनरक्षा पदक पुरस्कार २०१७ हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रणय राहूल तांबे यांचा जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राहूल तांबे हे मंडणगड तालुक्यात ढांगर येथे राहतात. जिल्हाधिकार्यांच्या दालनात कार्यक्रम झाला.
प्रणय तांबे यांनी १६ सप्टेंबर २०१६ रोजी मंडणगड येथे कॉलेजला जात असताना आडखळ – मंडणगड याला जोडणाऱ्या निवळी नदीवरील पूल तुटल्याने नदीमध्ये पडलेल्या तीन मुलींना वाचविलं होतं. जीवाची पर्वा न करता नदीमध्ये पडलेल्या तीनही मुलींना त्यांनी नदीतून बाहेर काढले व प्रथोमपचार करुन तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये नेले व त्यांचे प्राण वाचविले. या मोलाच्या कामगिरीबद्दल प्रणय यांना जीवनरक्षा पदक हा राष्ट्रपती पुरस्कार केंद्र शासनाकडून देण्यात आला. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या हस्ते प्रणय तांबे यांचा जीवनरक्षा पदक, एक लाख रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या दालनात सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रणय तांबे यांना आपण कॉलेज शिक्षण करत असताना पोल्ट्री फार्म चालवत असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी प्रणय यांना शासकीय योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयकृष्ण फड, तहसलिदार श्रीमती आयरे, मंडणगडचे नायब तहसिलदार आदी मान्यवंर उपस्थित होते.