रत्नागिरी : दापोली, लोटे परशुराम औद्योगिक वसाहतींमधील सुविधां विशेषत: रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, वीज पुरवठा बाबत एमआयडीसी आणि संबंधित विभागाने पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, अधीक्षक अभियंता नितीन पलसुळेदेसाई, प्रशांत पटवर्धन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी विषय वाचन करुन संगणकीय सादरीकरण केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उद्योग घटकाकडून प्राप्त झालेल्या अडीअडचणींबाबत चर्चा करुन त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून एमआयडीसी, महावितरण, पाटबंधारे विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी पुढाकार घ्यावा आणि पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.