मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकातील घाणेरडे सरबतच्या प्रकरणानंतर पालिकेने केलेल्या तपासणीत सरबत, बर्फाचे गोळे, ऊसाचा रस आदी ८७ टक्के थंडपेय आरोग्यास घातक असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला. मात्र थंडपेय विक्रेत्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाने हात आखडता घेतला. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईचा पारा सध्या ३३ अंशांवर गेला आहे. प्रचंड उकाड्याने मुंबईकर घामाने चिंब होत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने मुंबईकरांकडून थंडपेय पिण्यावर भर दिला जातो. मात्र रस्त्यावरील बर्फ व सरबत पिण्यास अयोग्य आहेत. थंडपेयांमुळे ई- कोलायचा धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल प्रशासनाकडून दरवर्षीच दिला जातो. परंतु, विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने सर्रास विक्री होताना दिसते. नुकतेच कुर्ला स्थानकात घाणेरड्या पध्दतीने सरबत बनवतानाचा प्रकार उघड झाला होता. यानंतर रेल्वे स्थानकातील सरबतांची स्टॅाल्स बंद करण्यात आली. मुंबई महापालिकेने याप्रकरणाची दखल घेत, मुंबईतील ५९६ थंडपेय विक्रेत्यांची तपासणी केली. यात बर्फाच्या १५६ नमुन्यांपैकी १४१ नमुने पिण्यास अयोग्य, लिंबू सरबतच्या २०४ नमुन्यांपैकी १५७ नमुने पिण्यास अयोग्य, उसाचा रसामधील २३६ नमुन्यांपैकी २२१ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी मुंबईकरांनाच थंडपेय पिऊ नये, असे आवाहन केले. प्रकारामुळे मुंबईकर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहे.