रत्नागिरी : रत्नागिरीत 50 लाखांचे अंमली पदार्थ (कोकेन) जप्त करण्यात आलं आहे. तसेच कोस्टगार्डच्या दोन कर्मचाऱयांसह तीघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. रविवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढया मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आलं आहे.
रत्नागिरी परिसरातल्या एमआयडीसी येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी परराज्यातूून काही इसम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमसह ग्रामीण पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं.. त्यानंतर रत्नागिरी एमआयडीसी परिसरात सापळा रचला. यावेळी तीनजण रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत एका पडक्या इमारतीमध्ये संशयास्पदरित्या बोलताना आढळले.. त्यानंतर पोलिसांनी या तिघांचीही चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी तिघांकडे प्लास्टिक पिशवीमध्ये पांढरा रंग असलेला पावडरचा पदार्थ दिसून आला. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक सपोर्टींग युनिटकडून नार्कोटिक्स टेस्ट केली असता हा पदार्थ कोकेन असल्याचं स्पष्ट झालं. हे 936 ग्रँमचं कोकेन पोलिसांनी जप्त केलं. हे कोकेन हरियाणातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी दिनेश शुभे सिंह (वय 23, रा. हरियाणा), सुनील कुमार नरेन्द्र कुमार रनवा (वय 26 , रा. जिल्हा शिखर राजस्थान), रामचंद्र तुलिचंद मलीक (वय 51, रा. सोनपत हरियाणा ) या तिघांना ताब्यात घेण्यात आलं. रत्नागिरीत त्यांनी विक्रीसाठीच हे कोकेन आणले होते. हे प्राथमिक चौकशी दरम्यान उघड झाले आहे. या तिघांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 8(क),21(क),29 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे..
या तिघांपैकी दिनेश आणि रामचंद्र हे दोघे कोस्टगार्डचे कर्मचारी आहेत. यातला एक सेलर आणि दुसरा क्लास टू ऑफिसर आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाचवेळी जवळपास 50 लाख रु.चे कोकेन जप्त करण्यात आलं आहे.