मुंबई, (निसार अली) : मालाड आणि कांदिवलीच्या सीमेवर एसव्ही रोड लगत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या कापडिया पेट्रोल पंपवर सकाळी 8.30ते 9 वाजताच्या सुमारास अनिल शिवराम मोरे (वय 57) हे नेहमीप्रमाणे रिक्षा मध्ये सीएनजी भरण्यास गेले होते. रिक्षामध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाल्याने रिक्षाचा चुराडा झाला. अनिल मोरे हे जबर जखमी झाले. सीएनजी भरणारा कर्मचारी शैलेश कृपाशंकर तिवारी याच्या उजव्या पायाच्या टाचेला मार लागला. शेजारी उभा असलेला दुसऱ्या गाडीचा चालक सोहेल कमाल अहमद शेख गंभीर जखमी झाले. अनिल मोरेसह तिन्ही जखमींचा उपचार पेट्रोल पंपच्या जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. तिघांची प्रकृती स्थिर आहे. अनिल मोरे यांच्या पायाला इजा झाली आहे.
दरम्यान, अग्निशमन दल, महानगर गॅस कंपनी चे अत्यावश्यक सेवा आणि कांदिवली पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी तसेच पालिका आर दक्षिण विभागाचे अधिकारी ही घटनास्थळी पोहचले. पोलीस आणि इतर संस्था स्फोटाच कारण काय याचा तपास घेत आहेत.