मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवात स्नेह आणि आनंदाच्या रंगांची उधळण व्हावी, त्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या जाणिवा जोपासून आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, आपल्या संस्कृतीत होळीला सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. राज्याच्या विविध भागात होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी त्यातील उत्साह आणि आनंदाचा धागा एकच आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धारेतील प्रमुख एक प्रवाह असलेला हा उत्सव साजरा करताना सामाजिक सलोखा आणि सौहार्द राखण्याची जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे. होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यासह पाण्याची नासाडी आणि वृक्षतोड टाळण्याचे आवाहनही मुख्यंत्र्यांनी केले आहे.