मुंबई : सरकारी वाहनांवरील लाल दिव्याच्या वापरावर केंद्रीय मंत्रिमंडळाने घातलेल्या निर्बंधांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. त्याची वैयक्तिक पातळीवर तात्काळ अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना या निर्णयाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी आपल्या शासकीय वाहनावरील लाल दिवा काढून टाकण्याचे आदेश दिले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून होणार असली तरी मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच गाडीवर लाल दिवा वापरणे बंद केले आहे. व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत असून आपण शासकीय वाहनावर लाल दिवा (Red Beacons) लावणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून त्याची पुणे दौऱ्यात तात्काळ अंमलबजावणीही केली. या निर्णयामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.