नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पवित्र दीक्षाभुमीला भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी दीक्षाभूमीच्या स्तुपासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प वाहून वंदन केले. स्तूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुष्प वाहून वंदन केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास मंत्री डॉ.नितीन राऊत, खासदार विनायक राऊत, माजी खासदार प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दीक्षाभूमी आगमनप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, ॲड. आनंद फुलझेले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनी शाल, दीक्षाभूमीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांचा सत्कार केला. श्री.ठाकरे यांनी स्तूपातील बांधकाम करण्यात येत असलेल्या सभागृहाची पाहणी केली. दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी हस्तांदोलन करुन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. मोठ्या संख्येने दीक्षाभूमीला भेट देण्यास आलेल्या नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.