मुंबई : कृषी, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात सरकारने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्रात अनोखे परिवर्तन पर्व सुरू झाले असून सबका साथ सबका विकास या सुत्रानुसार सुरू असलेला राज्याचा विकास हा सर्वसमावेशक होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंगापूर येथे केले.
दक्षिण कोरियातील विविध भेटी, उद्योगसमुहांशी चर्चा आणि सामंजस्य करार असा यशस्वी दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आज सकाळी सिंगापूर येथे दाखल झाले. सिंगापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया स्टडिज (आयएसएएस), नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस) आणि सीआयआय यांच्यावतीने आयोजित व्याख्यानात मुख्यमंत्री बोलत होते. इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया स्टडिजचे अध्यक्ष आणि राजदूत गोपीनाथ पिल्लई यावेळी उपस्थित होते.
यापूर्वी अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याच्या प्रगतीबाबत या व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून माहिती दिल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, आमच्यासाठी‘सबका साथ-सबका विकास’ हाच विकासाचा मूलभूत मंत्र असून त्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास सुरू आहे. आमच्या सरकारने शेती क्षेत्रामध्ये मदत आणि पुनर्वसनासारख्या तात्पुरत्या उपाययोजना करण्याबरोबरच शेतीत दीर्घकालिन गुंतवणुकीचा शाश्वत मार्ग स्विकारला आहे. त्याचप्रमाणे त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नियोजन आहे. भारतामधील 40 टक्के धरणे एकट्या महाराष्ट्रात असली तरी त्यांचे सिंचनातील योगदान केवळ 22 टक्के आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार योजनेची आखणी केली. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे गावे दुष्काळमुक्त होण्याबरोबरच सिंचनासाठी पाण्याचे शाश्वत साठे निर्माण होत आहेत. तसेच हवामान बदलाच्या समस्येसंदर्भात उपाययोजना करणे शक्य झाले आहे.
ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून राज्य सरकारने उद्योग क्षेत्रात सुधारणांची मोठी प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यामुळे उद्योगांसाठी जमीन मिळविण्यासह विविध परवानग्या कमी वेळेत आणि एकाच ठिकाणी मिळविणे शक्य झाले आहे. यापूर्वी एक हॉटेल सुरू करण्यासाठी 176 परवानग्या घ्याव्या लागायच्या. मात्र, आता ही संख्या 25 एवढी कमी करण्यात आली असून त्याही ऑनलाईन प्राप्त होत आहेत. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या 50 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. राज्याने राबविलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरणाच्या अंमलबजावणीची जागतिक बँकेने प्रशंसा केली आहे. तसेच शेतीमधील सुधारणांमध्ये राज्याचा देशात प्रथम क्रमांक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक परिवहनासंदर्भात राज्याने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे दळणवळण क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गेल्या 60 वर्षांत केवळ 70 लाख प्रवासी क्षमता निर्माण करण्यात आली आहे. परंतु, आता अवघ्या 4 वर्षांत अतिरिक्त 90 लाख क्षमता आम्ही निर्माण करीत आहोत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रगती या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यांमध्ये निर्माण झालेल्या उत्तम समन्वयाची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. देशातील सर्वात गतिमान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या मार्गाच्या माध्यमातून देशाचे लॉजिस्टिक हब आणि झिरो माईल असलेले नागपूर शहराला मुंबई या बंदराशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. व्याख्यानानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
सिंगापूर येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीने विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित राऊंड टेबल चर्चेलाही आज मुख्यमंत्री उपस्थित होते. सिंगापूरमधील आघाडीच्या कंपनी आणि विशेषत्त्वाने महाराष्ट्रात विस्तार असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत विविध विषयांवर संवाद साधला. तसेच राज्यातील गुंतवणूक आणि विस्तार संधींची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली.
त्याचप्रमाणे जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून ख्याती असलेले आणि दक्षिणपूर्व आशियातील सर्वांत मोठे वाहतूक हब म्हणून ओळखले जात असलेल्या चांगी विमानतळाला आज महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने भेट दिली.