मुंबई : विलेपार्ले येथे जनसेवा समिती आयोजित नववर्ष स्वागत महास्फूर्ती यात्रेमध्ये सहभाग घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. “आधुनिकतेकडे भारत २०२० या विषयावर आधारीत या यात्रेमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे, रॅली काढण्यात आल्या होत्या. त्यावर पुष्पवृष्टी करुन मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी फडणवीस म्हणाले, अशा यात्रांच्या माध्यमांतून पार्लेकरांनी महाराष्ट्रीयन संस्कृती टिकविण्याचे कार्य केले आहे. आजच्या यात्रेत सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या उपक्रमांचाही समावेश आहे. संस्कृतीला पुढे नेण्याचे काम अशा यात्रांच्या माध्यमातून होते.
यावेळी लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या 32 सीसीटीव्हीच्या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या सीसीटीव्हींना शासनाच्या मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणेशी जोडून त्याचा प्रभावी वापर केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
यात्रेत विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या पार्ले येथील मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात्रेमध्ये जलयुक्त शिवार, कल्याणकारी भारत, प्रवासी भारत, उद्योगशील भारत, अर्थसाक्षर भारत अशा विविध देखाव्यांतून केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सहभागातून आधुनिकतेकडे जात असलेल्या विकसित भारताचे चित्र साकारण्यात आले होते. यात्रेमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत, खा. पूनम महाजन, आ. ॲड. पराग आळवणी आदी मान्यवर उपस्थित होते.