ठाणे : स्टार्टअप्स कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून टाटा सारख्या नामांकित आणि विश्वासार्ह कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात स्टार्ट अप्ससाठी पोषक वातावरण तयार करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अशा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या भारतातील सर्वात मोठ्या अशा टीसीएस ऑलम्पस सेंटर या भव्य कॅम्पसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हिरानंदानी इस्टेट येथे पार पाडले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
१९ लाख स्क्वेअर फुट जागेत विस्तारलेल्या या कार्यालयासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गेल्या वर्षी हिरानंदानी यांच्याशी करार केला होता. याठिकाणी एकाचवेळी ३० हजार कर्मचारी काम करू शकतील अशी व्यवस्था आहे. टीसीएस आणि हिरानंदानी यांच्यात या जागेसाठी १५ वर्षांचा करार करण्यात आला आहे.
डिजिटल रिस्पॉन्सीबल इकॉनॉमीकडे वाटचाल
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कि, आज देशात निश्चलिकरण झाले त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. एकीकडे टाटा कन्सल्टन्सी ही डिजिटल क्रांतीमध्ये आपले बहुमुल्य योगदान देत आहे तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणत आहे त्याचवेळी डिजिटल रिस्पॉन्सीबल इकॉनॉमीकडे आपली वाटचाल सुरु होत आहे हा निश्चितच एक चांगला योगायोग आहे. टीसीएस आणि टाटा या डिजिटल युगात काय उपक्रम करीत आहेत आणि देशाला त्याचा काय फायदा होतं हे टीकाकारांनी प्रत्यक्ष पाहून समजावून घ्यावे. ठाणे येथील या देशातील अद्ययावत अशा कॅम्पस मुळे ३० हजार जणांना रोजगार मिळणार आहे त्याचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले कि, यानंतर नागपूर येथील कंपनीच्या प्रकल्पातही १०हजार तंत्रज्ञाना रोजगार मिळणार आहे तसेच पुणे येथील प्रकल्पामुळे तर महाराष्ट्राची मान डिजिटल क्षेत्रात अधिक उंचावेल.
पुणे ही देशातील स्टार्टअप्सची राजधानी होणार
देशातील ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षाखालील असून ही तरुण पिढी तंत्रज्ञानात प्रगत आहे तसेच त्यांना नवीन उपक्रम सुरु करण्याची उर्मी आहे. त्यांना आता नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बनायचे आहे त्यामुळे पुढील काळात स्टार्ट अप्सना उत्तेजन दिले जाईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुणे ही देशातील स्टार्ट अप्स ची राजधानी होईल असा विश्वास व्यक्त केला. लवकरच राज्याचे फिनटेक धोरण ठरविण्यात टाटा सन्ससारख्या सक्षम कंपन्यांची मदत घेतली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. टाटा समूह नाशिक येथे सामाजिक जबाबदारीतून करीत असलेल्या उपक्रमांचीही मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली.
आपण केवळ चीनमध्ये अतिशय कमी कालावधीत मोठे मोठे प्रकल्प बांधून पूर्ण झाले असे पाहतो पण हा टीसीएसचा अवाढव्य प्रकल्प केवळ १८ महिन्यात उभारला त्याचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
ईझ ऑफ डुईंग बिजिनेस मध्ये महाराष्ट्र पुढे- टाटा सन्सचे चेअरमन
याप्रसंगी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रसेकरन यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र हा ईझ ऑफ डुईंग बिजिनेस मध्ये अव्वल क्रमांकावर आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योग विभाग व शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले. ते म्हणाले कि १५० वर्षांपासून टाटा समूह हा विविध माध्यमातून आणि क्षेत्रात या देशात कार्यरत आहे मात्र आमचे मूळ हे महाराष्ट्र आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी देखील मनोगत व्यक्त केले . ते म्हणाले कि मुंबई हे संपूर्ण देशात आजही गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे स्थळ असून शासन आम्हाला खूप सहकार्य करीत आहे.
प्रारंभी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नामफलकाचे अनावरण तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, कपिल पाटील, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, गणपत गायकवाड, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह, निरंजन हिरानंदानी आदि मान्यवर उपस्थित होते.