मुंबई,: काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष शेतकरी आंदोलनाच्या आडून हिंसेचा डाव खेळत आहेत, असा सनसनाटी आरोप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. संप चिघळावा, पोलिसांशी संघर्ष व्हावा, यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मकरित्या विचार करत आहे, तसेच चर्चेसाठी तयार आहोत असेही त्यांनी सांगितले. शेतकरी संपाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
मागील सरकारच्या तुलनेत हे सरकार शेतकऱ्यासाठी सकारात्मक काम करत आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, आज राज्यात १ कोटी ३४ लाख खातेदार शेतकरी आहेत. सुमारे ३१ लाख शेतकरी कर्जबाजारी आहेत, ज्यांना पुन्हा कर्ज घेता येत नाही. तर ९० लाख असे आहेत जे नियमित कर्ज घेतात व ते वेळेत फेडतात. त्यामुळे या ३१ लाख शेतकऱ्यांनाच कर्जमुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी साधारण ३० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. मात्र सरसकट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी कुठल्याच सरकारला शक्य नाही. तसेच शेतकर्याच्या मागणीप्रमाणे दुधाला भाव द्या, असे आवाहन त्यांनी दूध संघांना केले.