मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकार कालपासूनच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांशी संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली असून पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्राकडूनही तातडीची मदत म्हणून 20 कोटींचे अर्थसहाय्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. राज्य शासन केरळ सरकारशी कालपासून सातत्याने संपर्कात असून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. त्यात एका विशेष पथकाची नियुक्ती करुन त्यावर याबाबतच्या समन्वय आणि कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
केरळ पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा ही प्राधान्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक, स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्थांशी राज्य शासनाने समन्वय साधत अन्न पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. एमसीएचआय – क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किमतीचे अन्न उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राजस्थानी वेल्फेअर असोसिएशनकडून 51 लाख आणि जितो इंटरनॅशनलकडून 51 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 11 टन अन्न उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यापैकी 6 टन अन्न पुरवठा आज सायंकाळपर्यंत रवाना होणार आहे.