रायगड जिमाका दि. 27- शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत रायगड जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, अधिक गतीमान व सुलभरितीने सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणानी समन्वयाने काम करावे अशा सूचना नगरविकास विभाग(2)चे प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज यांनी दिल्या
जिल्हाधिकारी कार्यालयात 100 दिवस कृती आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीमध्ये पालकसचिव गोविंदराज बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी सा.प्र.रविंद्र शेळके यांसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये 100 दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यात समाधानकारक काम करण्यात येत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.सर्व प्रशासनाने यापेक्षा अधिक उत्तम काम करण्याची जिल्ह्यातील अधिकार्यांमध्ये क्षमता आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाविन्यपूर्ण व कल्पकतेमधून उपक्रम राबवून आपले कार्यालय व जिल्हा आदर्श होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा प्रशासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल मनपाच्या कमांचे सादरीकरण केले. या बैठकीला सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.