रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आणि नवीन पिढी या व्यवसायात यायला तयार होत नसल्याने, भविष्यात भारतातील सर्कस व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ‘सुपर स्टार’ सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी व्यक्त केली. रत्नागिरी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रत्नागिरी येथील आठवडा बाजार नजीक रहाटघर येथे सर्कसचे प्रयोग भरविण्यात आले आहेत. १३ एप्रिल पासून महिनाभर दररोज ३ खेळ याप्रमाणे ही सर्कस सुरू असेल. मात्र सद्यस्थितीत सर्कस हा व्यवसाय चालवणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. माझे कुटुंब मुळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील. आजोबा रामप्पा माने यांच्या काळापासून सर्कस व्यवसाय सुरू झाला. त्यांच्यानंतर वडिलांनी काही वर्षे हा व्यवसाय चालवला व त्यांच्या मृत्यूनंतर मी स्वत: ५ वर्षे दुसऱ्या सर्कसमध्ये काम केले. त्यानंतर १९९३ मध्ये ‘न्यु गोल्डन’ या नावाने सर्कस सुरू केली. २०११ मध्ये हा व्यवसाय विकून, त्याचवर्षी ‘सुपर स्टार’ नावाने सर्कस सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा या राज्यात सर्कसचे प्रयोग करत आहे, अशी माहिती माने यांनी दिली.
शासनाच्या निर्णयानुसार, सर्कसमध्ये प्राणी, पक्षी यांचा वापर करण्यास बंदी असल्यामुळे केवळ अंगकसरतीचे खेळ सादर केले जात आहेत. कलेची जाण असलेला प्रेक्षक सर्कस बघायला नक्कीच येतो. सर्कसमध्ये एकूण सुमारे ६० कलाकार असून, त्यापैकी ४० महिला कलाकार आहेत. वर्षातील १२ महिने आमची सर्कस चालू असते. पावसाळ्यात वॉटरप्रुफ तंबू उभारून, सर्कसीचे खेळ करतो, असे ही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत भारतात २० ते २२ सर्कस आहेत. परंतू, हा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे आणि या व्यवसायात नवीन पिढी येण्यास तयार होत नाही. परिणामी भविष्यात भारतात तरी सर्कस हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी भीती माने यांनी यावेळी व्यक्त केली.