रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे धार्मिक व पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताह 12 ते 18 ऑगस्ट यादरम्यान दररोज सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत मंडळाच्या जोशी पाळंद येथील कै. ल. वि. केळकर वसतिगृह इमारतीतील भगवान परशुराम सभागृहामध्ये साजरा होणार आहे.
12 ऑगस्टला डोंबिवली येथील हभप किरण फाटक हे अहंकार (गर्वहरण पंडितांचे) यावर आख्यान देतील. कीर्तनातून लोककल्याण व लोकरंजन व्हावे व हरीस्मरण व्हावे या उद्देशाने त्यांनी कीर्तनक्षेत्रात पाऊल टाकले. संगीत अलंकार ही पदवी प्राप्त असून कैलासबुवा खरे यांच्याकडून त्यांनी कीर्तनाचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांच्या आजी गंगाबाई फाटक यासुद्धा कीर्तनकार होत्या.
13 ऑगस्टला घाणेकर आळीतील हभप कैलास खरे यांचे श्रीराम- हनुमंत युद्ध आख्यान होईल. शास्त्रीय संगीताचे शिक्षण ते किरण फाटक यांच्याकडे घेत असून त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. पनवेल येथील नंदकुमार कर्वेबुवा यांच्याकडे ते कीर्तनाचे शिक्षण घेत आहेत. मुंबई, पुणे, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश येथे 500 च्या वर कीर्तने त्यांनी केली आहेत.
14 ऑगस्टला चाफे रत्नागिरी येथील राजेंद्र मुळे हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांवर आख्यान देतील. राजकारणविरहित भक्तीरसप्रधान व रसाळ निरूपण करण्यात त्यांची ख्याती आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते कीर्तनसेवा करत असून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये 2000 हून अधिक कीर्तने त्यांनी केली आहेत.
15 ऑगस्टला मुळचे आंजर्ले, दापोली येथील युवा कीर्तनकार निहाल खांबेटे हे आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर आख्यान देतील. सध्या ते पुणे येथे पदवी अभ्यासक्रम शिकत आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्याकडे कीर्तनाचे शिक्षण सुरू आहे. हार्मोनियम व गायनाचे शिक्षण घेत असून 50 हून अधिक कीर्तने केली आहेत.
16 ऑगस्टला पुण्याच्या डॉ. सौ. प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर या छत्रपती शिवाजी महाराजांवर कीर्तन करणार आहेत. एमए संगीत, संगीत अलंकार (गायन) या पदव्या त्यांना प्राप्त आहेत. कीर्तनाचे मार्गदर्शन वडील डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्याकडून त्यांनी घेतले आहे. आधुनिक महिपती संतकवी दासगणूंच्या कीर्तन आख्यानातील सांगीतिक आयामांचा चिकित्सक अभ्यास या विषयावरील संशोधनासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. 2009 पासून श्री दासगणू महाराजांच्या कीर्तन परंपरेचा महाराष्ट्रात प्रचार, प्रसार करत आहेत.
17 ऑगस्टला मच्छींद्रनाथ या आख्यानविषयावर कल्याण येथील सौ. वसुधा दाते कीर्तन करतील. त्या बीए, बीएड असून कीर्तनाचे प्रशिक्षण नागपूरचे अण्णाजी पात्रीकर व पुण्यातील नारद मंदिरातून त्यांनी घेतले आहे. नागपूर आकाशवाणी व महाराष्ट्राबाहेर मराठी, हिंदीतून 40 वर्षे कीर्तन त्या करत आहेत. कीर्तन हा व्यवसाय न मानता कीर्तन हे समाजप्रबोधन, भक्तीचे साधन, सांस्कृतिक संवर्धनाचे माध्यम आहे, अशी त्यांची धारणा आहे.
18 ऑगस्टला मिरजेचे कीर्तनकार रोहित दांडेकर हे श्रीमनसुख चरित्र या विषयावर आख्यान देणार आहेत. वारकरी व नारदीय पद्धतीने ते कीर्तन करतात. गोव्यातील गणपतीबुवा दांडेकर यांच्याकडून नारदीय कीर्तनाचे शिक्षण घेतले. आतापर्यंत 600 हून अधिक कीर्तने केली आहेत.
कीर्तन सप्ताहाला ऑर्गनसाथ वरद सोहनी व तबलासाथ प्रथमेश शहाणे व हेमंत परांजपे करणार आहेत. कीर्तन सप्ताहातील सर्व कीर्तने किंवा एखाद्या कीर्तनासाठी आर्थिक साह्य (प्रायोजकत्व) तसेच कीर्तन झाल्यानंतर प्रसाद रूपाने मदत देता येईल. त्यासाठी श्रीनिवास जोशी (9404332705) यांच्याशी संपर्क साधावा. श्रावण कीर्तनसप्ताहास कीर्तनप्रेमी, कुटुंबीय, मित्रमंडळींसह उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.