मुंबई : बालकांवरील शोषणाविरोधात चिराग ॲप तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंडे म्हणाल्या की, बालकांच्या सुरक्षेची समस्या फार महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी चिराग नावाचे ॲप तसेच रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या सशक्तीकरणासाठी तयार झालेले एस.ओ.पी. महत्त्वाचे आहे. बालकांचे शोषण हे जवळच्या व्यक्तींकडूनच जास्त प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बालकांच्या शोषणाविरुद्धचा आवाज दाबला जातो. तो आवाज चिराग ॲपच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहचविण्याचे काम सामाजिक भावनेतून जनतेने करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील रस्त्यावर, पुलाखाली, सार्वजनिक पार्कमध्ये अनाथ किंवा पालकांसोबत राहणाऱ्या समस्याग्रस्त बालकांना व त्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात एक नवी उमेद जागृत करण्यासाठी शासनाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे चिराग ॲपच्या उद्घाटनानिमित्त झालेल्या ‘तमसोमा ज्योतिर्गमय’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार संजय केळकर, अतुल सावे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, औरंगाबादचे महापौर बापू घडामोडे, आयोगाचे सदस्य संतोष शिंदे, शालिनी कऱ्हाड, अस्मा शेख पटेल, विजय जाधव, आशा राणे, जरीम गुप्ता, स्वरुप रावल, बागला, आयोगाचे सचिव ए. एन. त्रिपाठी आदींची उपस्थिती होती.
सामान्य जनतेमध्ये बालकांच्या हक्कांबाबत कायदे व नियमांची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. तसेच बालकांविषयी महत्त्वाचे कायदे मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा, पोक्सा कायदा, काळजी व संरक्षण या सर्व कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी होणे गरजेचे आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.
चिराग ॲप ॲन्ड्रॉईड व आय.ओ.एस. मोबाईल वर उपलब्ध
बालकांच्या अधिकारांचे संरक्षण कसे होईल तसेच या हक्कांचे सरंक्षण करण्याची यंत्रणा व जनतेमध्ये सुसंवाद कसा साधला जाईल, बालकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्काची माहिती लोकांपर्यंत पोहचण्याकरिता चिराग नावाचे ॲप आयोगाने विकसित केले आहे. हे ॲप ॲन्ड्रॉईड व आय.ओ.एस. मोबाईल वर उपलब्ध आहे. या ॲपवर तक्रार आल्यावर आयोग त्याची त्वरीत दखल घेऊन पुढील कार्यवाही करीत असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
दत्तक योजनेस प्रोत्साहन
अनाथ बालकांना दत्तक घेण्याच्या योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बालकांना चांगली घरे मिळावी, त्यांना चांगली सुरक्षा मिळावी यासाठीही शासन प्रयत्न करीत आहे. शासन राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कौशल्य विकास योजना राबवित आहे. कमवा व शिका याअंतर्गत मुलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान सुखी करण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माझी कन्या भाग्यश्री योजना
केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत मुलींच्या जन्माचे स्वागत, तिचे आरोग्य, शिक्षण व जन्म दिवस साजरा करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. तसेच मुलीच्या मातेचा, आजी-आजोबांचा आणि गावांचाही गौरव करण्यात येतो. यामुळे मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बालकांच्या समस्या आणि यशोगाथा असलेल्या विविध पुस्तकांचे प्रकाशन मंत्री मुंडे यांचे हस्ते करण्यात आले. यशस्वी 11 व्यक्तींचा गौरवही करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आयोगाचे सचिव ए.एन. त्रिपाठी यांनी प्रास्ताविक केले.