रत्नागिरी : छुप्या रितीने चिपळूणमध्ये सुरू असणार्या गावठी दारुच्या भट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुच्या अवैध विक्रीविरोधात कडक मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात गावठी दारूच्या भट्ट्या बंद असतानाही तालुक्यातील रावळगाव येथ काही दिवसांपासून भट्टी सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि गुरुनाथ हळदणकर याच्या घरी धाड टाकली. यावेळी काळ्या गुळाच्या २० किलो वजनाच्या १९९ ढेपा, तसेच नवसागरचे ५० किलोचे ६ बॉक्स जप्त केले गेले.
त्यानंतर ज्या ठिकाणी गावठी दारूची भट्टी सुरू होती. त्या ठिकाणीही धाड टाकून गावठी दारूचे बॅरल, काही टाक्या यांसह एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हळदणकर आणि कल्याण सुर्वे या दोघांना अटक करण्यात आली. एक जण फरार झाला आहे.
पोलिसांचा वचक नसल्याने दारू भट्टी सुरू
रावळगाव येथे गावठी दारूची भट्टी सुरू होती. ही दारू बनविण्यासाठी पाहिजे असणारा लाखोंचा मुद्देमाल या ठिकाणी उपलब्ध होता. तरिही, पोलिसांच्या निदर्शनातून हा प्रकार सुटला. गावठी दारुच्या विक्रीला बंदी असताना ती बनविण्याचे काम येथे चालत होते आणि त्यावर धाड टाकण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला यावे लागले. पोलिसांचा वचक नसल्यानेच खुलेआम या ठिकाणी दारूची भट्टी सुरू होती, हे स्पष्ट झाले आहे.