रत्नागिरी : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत चिपळूण येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सुवर्ण सिंहासनाच्या तयारीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला १२ पुरोगामी-आंबेडकरी संघटनांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चितळे मंगळ कार्यालय येथे हा प्रकार घडला.
बैठकीत भिडे यांनी ‘32 मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना व खडा पहारा योजना’ या विषयावर मार्गदर्शन केलं. साडेपाच वाजता बैठकीला सुरुवात झाली. सभा सुरू असतानाच भिडे यांचा अनेक संघटनांनी एकत्र येत विरोध केला. जवळपास चार ते पाच हजार कार्यकर्ते सभा रोखण्यासाठी सभेच्या ठिकाणी दाखल झाले होते.
जमावाने सभागृहाकडे जाणारे सर्वच रस्ते रोखून धरले. यामुळे संभाजी भिडे यांना सभागृहस्थळातून मार्गस्थ कसे करायचे असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला होता. भिडे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना इनोव्हा गाडीत मध्ये बसण्याची विनंती केली, मात्र त्यांनी मी पहिल्याच सीटवर बसणार असा आग्रह धरला. याच काळात दोन्ही मार्गावरीलं जमाव आक्रमक झाल्यामुळे संभाजी भिडेना जवळजवळ अर्धा तास गाडीत प्रतीक्षा करावी लागली. अखेर रत्नागिरी पोलिसांनी एका दिशेला उभ्या असलेल्या जमावावर मार्ग मोकळा केला आणि साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे सभागृहातून मार्गस्थ होऊ शकले.
भिडेंची माध्यमांवर आगपाखड
सभा संपल्यानंतर सभागृहातून बाहेर पडताना भिडे यांनी माध्यमांवर आगपाखड केली. तुम्ही बेकार आहेत, गेले तीन महिने वांग्याचं भूत करून विषय चघळत ठेवलात, मला तुमचं तोंड बघायचं नाही असे भिडेंनी म्हटले.