रत्नागिरी (आरकेजी): चिपळूण शहरातील पालिकेच्या जलतरण तलावात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. कपिल रघुनाथ सांबरेकर (१७, सावर्डे) असे मृत विद्याथ्र्याचे नाव आहे. कपिलने ११ वीतून १२ वीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. जलतरण तलावात बुडून मयत होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे जलतरण तलावातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पालिकेत धाव घेऊन, पालिकेला जबाबदार धरत, संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पोलिस स्थानक तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ सांबरेकर हे मुळचे बेळगांवचे रहिवासी असून, कामानिमीत्त ते काही वर्षापूर्वी सावर्डे येथे स्थायिक झाले. दरम्यान, साोमवारी कपिल हा आपले मित्र आतीष संजय कदम, सौरभ रामागडे व अक्षय रामागडे यांच्यासोबत चिपळूण पालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी आला होता. पोहण्याचा पास घेतेवेळी चौघांनीही पोहता येत असल्याचे सांगितले होते. कपिलचे मित्र चार वाजल्यापासून पोहत होते. मात्र कपीलला पोहता येत नसल्याने, तो काठावर बसून, मोबाईलवर होता. त्याला संरक्षणासाठी दिलेले जॅकेट काढून त्याने तलावाशेजारी ठेवले होते.
दरम्यान, काही वेळानंतर कपिलने तलावात उडी मारण्यासाठी असलेल्या लोखंडी उंचवट्यावरून उडी मारली. उडी मारताना त्याला काहीजणांनी पाहिले. परंतू, बराच वेळ झाला तरी कपिल पाण्याबाहेर न आल्याचे उपस्थित ट्रेनरच्या लक्षात आले. कपिलला काढण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. त्याची बॉडी जड झाली होती. ३-४ फूट पाणी असलेल्या भागातून त्याला वरती काढले. ठेकेदार घोसाळकर यांच्यासह सहकाऱ्यांनी पोट दाबून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने डोळेही उघडले होते. तत्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेले असता उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
काही दिवसापूर्वीच जलतरण तलावासाठी रामतिर्थ तलावातील अशुद्ध पाणी वापरले जात असल्याचे समोर आले होते. यावरून शहरात हंगामाही झाला होता. त्यानंतर तलावाची साफसफाई करून स्वच्छ पाण्याचा वापर झाला. मात्र, महिनाभरात या तलावात शालेय विद्याथ्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, तलावातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कपिलच्या घटनेनतर संतप्त ग्रामस्थांनी पालिकेत धाव घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.