मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तांबी नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे, असा अहवाल प्राप्त झाला आहे. पुलाच्या किरकोळ दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. ते काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर व चिपळुण तालुक्यांतील रस्ता व पुलाची झालेली दुरावस्थासंदर्भात विधानसभा सदस्य सदानंद चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम वगळून) विभागाअंतर्गत पाच हजार पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आरवली-माखजन या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. यामध्ये प्राथमिक कामे न करता पक्का रस्ता करणे आवश्यक आहे. तसेच दहा किलो मीटर अंतराचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत दुरुस्ती करण्याचा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन आहे, असेही पाटील यांनी सांगितले. या प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अनिल गोटे, सुभाष साबणे यांनी सहभाग घेतला.