रत्नागिरी, प्रतिनिधी : चिपळूणला पुराचा फटका बसला तेव्हा कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आलं की नाही याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि याबाबत आपण जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील यांच्याशी बोलणार असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी चिपळूणमध्ये बोलताना सांगितलं. अधिकारी आणि पालकमंत्री यांच्यातील परस्पर विरोधी विधानामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर होण्यासाठी याबाबत समिती नेमून अहवाल लोकांसमोर येणं आवश्यक असल्याचे तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते आज पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलत होते.चिपळूणला महापुराचा फटका बसला, मात्र कोळकेवाडी धरणातून पाणी सोडताना पूर्वकल्पना दिली नाही, त्यामुळे फटका बसला असं नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र याबाबत मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. जिल्हाधिकारी, पालकमंत्री प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की पाऊस, धरणातून पाण्याचा विसर्ग, आणि समुद्राचं उधाण या सर्वांमुळे पुराचा मोठा फटका बसल्याचं म्हणाले होते. तर धरण सुरक्षा आणि पुनर्स्थापना समिती पुणे विभाग अध्यक्ष दिपक मोडक यांनी म्हटलं होतं की, कोळकेवाडी धरणातून गेल्या 30 वर्षांत दरवाजे उघडले नाहीत. चिपळूणात आलेला पूर पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आलेल्या लोंढ्यामुळे पूर आला आहे. कोळेकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं नाही, असं मोडक म्हणाले होते. यामुळे जनतेत संभ्रम आहे.
याबाबत बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की,
एवढा पाऊस झाला म्हटल्यावर कोळकेवाडी धरणातून विसर्ग होणं स्वाभाविक आहे. इतक्या पावसाच्या नंतर विसर्ग होणार नाही असं मला स्वतःला वाटत नाही. दीपक मोडक एक चांगले अभियंते आहेत. माझ्यावेळी सुद्धा ते मुख्य अभियंते होते. त्यांनी हे विधान कशाच्या आधारे केलं आहे, कुठल्या माहितीच्या आधारे केलं आहे ते तपासून घ्यावं लागेल. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही आपण विनंती करणार आहोत, की लोकांच्या मनात शंका राहता कामा नये, कोळकेवाडी धरणातून विसर्ग झाला असेल तर तो किती झाला, विसर्ग होताना पूर्वसूचना का दिली गेली नाही, याची माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि याबाबत आपण जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील यांच्याशी बोलणार असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी चिपळूणमध्ये बोलताना सांगितलं.














