कर्मचाऱ्यांनीही दिले जिल्हा आपत्ती सहाय्यता निधीसाठी 4 लाख; प्रशांत यादव यांच्याकडूनही जिल्हा पोलीस विभागासाठी 1 लाखाची मदत
रत्नागिरी : कोरोनाच्या लढ्यात सरकारच्या मदतीसाठी अनेक दानशूर व्यक्ती संस्था पुढे येत आहेत. दरम्यान नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ‘चिपळुण नागरी सहकारी पतसंस्थे’ने आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी देखील या लढ्यासाठी आपला हातभार लावला आहे. पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला दोन दिवसांचा पगार जिल्हा आपत्ती सहाय्यता निधीसाठी दिला आहे.. याची रक्कम जवळपास 4 लाख रुपये इतकी आहे. हे दोन्ही धनादेश आज चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे संस्थेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी स्वप्ना यादव यांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव तसेच संस्थेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे देशासह महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने रुग्ण आहेत. या विषाणूने राज्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण केलेली आहे. रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ती उपाययोजना करत महाराष्ट्र शासन राज्यातील जनतेचीही योग्य ती काळजी घेत आहे.. दरम्यान सरकारकडून करण्यात आलेल्या मदतीच्या आवाहनाला अनेकजण सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या आणि सहकार क्षेत्रात अग्रेसर राहून नेहमीच सामाजिक भान जपणाऱ्या ‘चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेनेही शासनाच्या या कार्यास हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश संस्थेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या 2 दिवसाच्या पगाराची रक्कम रुपये 4 लाख जिल्हा आपत्ती सहाय्यता निधीसाठी दिले. या चार लाखांचाही धनादेश संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आज सुपूर्द केला.
प्रशांत यादव यांचीही 1 लाखाची मदत
नेहमी समाजकार्यात पुढे असणारे चिपळूणचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनीही जिल्हा पोलीस विभागासाठी मदत केली आहे. यादव यांनी एक लाखांची मदत केली असून हा धनादेश त्यांनी आज चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याकडे यावेळी सुपूर्द केला. सध्या कोरोनाच्या लढाईत पोलिसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.