
चिपळूण — चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या सहकार भवनमध्ये रविवार दिनांक १९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता सहकार मेळावा व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हा मेळावा व कार्यशाळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी सेवा निवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील व प्राचार्य डी. सी. देशपांडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरीतर्फे पारदर्शकपणे आर्थिक कारभार पाहतांना समाजपयोगी उपक्रम देखील राबवले जातात. यामध्ये कोरोना काळ असो, महापूर काळ असो या कालखंडात संस्थेच्या सभासदांना सहकार्याचा हात दिला गेला. तसेच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त चिपळूण नागरीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. तसेच क्रीडा खेळाला देखील प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दरवर्षी कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर शाखांतर्गत क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते.
तर दुसरीकडे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सहकार चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी सातत्याने कार्यशाळा आयोजित केली जाते. तत्पूर्वी संस्थेच्या वाटचालीत तरुणांचा सहभाग व्हावा, यासाठी संस्थेतर्फे समन्वयक नेमले जातात. या समन्वयकांच्या माध्यमातून चिपळूण नागरीतर्फे सर्वसामान्यांना जोडण्याचे काम केले जाते. या समन्वयकांसह सुशिक्षित तरुणांना सहकार चळवळ अधिकपणे समजावी यासाठी संस्थेतर्फे सहकार मेळावा व कार्यशाळा आयोजित केली जाते. या अनुषंगाने रविवारी सहकार मेळावा व कार्यशाळा होणार आहे. तरी या कार्यशाळेला सहकार चळवळीतील कार्यकर्ते तसेच सभासद, हितचिंतक व कर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.
















