चिपळूण :- चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने २ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा नुकताच पूर्ण केला असून शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात सहकार मेळावा व कार्यशाळा चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
यावेळी माहिती देतांना त्या म्हणाल्या की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने काम करुन केवळ ३१ वर्षाच्या कालखंडात २ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करुन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. संस्थेच्या कार्यपध्दतीप्रमाणे दर पाच वर्षांचा संकल्प आराखडा तयार करण्यात येत असतो व त्याप्रमाणे तो पुर्णत्वास नेण्यासाठी अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने वर्षभर काम करण्यात येत असते व त्याचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या मार्च २०२८ च्या संकल्प आराखड्यातदेखील गेल्या ३० वर्षाच्या यशस्वीतेप्रमाणे या वेळीही संस्थेचे नियोजीत उदिष्ट पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘सक्षम महिला, सक्षम कुटूंब’ कर्ज योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत, याचे समाधान आहे. तसेच महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या ठेव योजनेत ११ कोटी २० लाख तर गृह लक्ष्मी ठेव योजनेत १७ कोटी ६२ लाख रुपये संकलित झाले आहेत, अशी माहिती यावेळी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
तर आता नुकतीच आता श्रावण ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सर्वसामान्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील केले आहे.
तर आता शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बहादुर शेख नाका येथील संस्थेच्या सहकार भवन सभागृहात सहकार मेळावा व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई येथील एस. बी. पाटील, माजी सहनिबंधक लेखापरीक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे येथील तानाजी कवडे यांची प्रमुख उपस्थिती असून ते उपस्थितीतांना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या सहकार मेळावा व कार्यशाळेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक मंडळासह मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.