प्रकाशझोतात खेळवले जाणार सामने
*संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते होणार क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन*
चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा ३० एप्रिल व १ मे रोजी प्रकाशझोतात चिपळूण-बहादूरशेखनाका येथील नगर परिषदेच्या सावरकर मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन ३० एप्रिल रोजी चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती चिपळूण नागरीच्या कार्यकारी मुख्य अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे. या संस्थेच्या रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५० शाखा कार्यरत आहेत. या ५० शाखांमधील कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी, सराफ व समन्वयक कार्यरत असून अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करणारा वर्ग म्हणून या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा नाव लौकिक आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी संस्थेमार्फत चांगले वेतन दिले जात असतानाच त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धांना क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
यावर्षीदेखील ३० एप्रिल व १ मे रोजी येथील सावरकर मैदानात चिपळूण नागरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. चिपळूण नागरी संचालक मंडळ, वाशिष्ठी इलेव्हन, पत्रकार इलेव्हन, चिपळूण रायझर यांचे प्रेक्षणीय सामने होणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला व उपविजेता संघाला आकर्षिक शिल्ड देण्यात येणार आहे. संस्थेच्या नाविन्यपुर्ण उपक्रमास क्रिडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी गेल्या वर्षी प्रमाणे उपस्थित राहुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे.