रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): चिपळूण नगर पालिकेला ५० लाख रूपयांचा निधी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या निधीतून देणार असल्याचे आश्वासन माजी खासदार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी दिले. राणे यांनी नगरपरिषदिला सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते. विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे, सदस्य आशिष खातू, विजय चितळे, करामत मिठागरी, नगरसेविका संजीवनी शिगवण, सफा गोठे, शिवानी पवार, वर्षा जागुष्टे यांनी त्यांचे स्वागत केले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, पवन तलाव क्रीडा संकुल, महिला क्रीडा संकुल, मटण-मच्छी मार्केट इमारत, भाजी मंडई आदी प्रकल्पांबाबत सुमारे तासभर चर्चा केली. काही कामे प्रशासकीय कामांच्या पूर्ततेमुळे तर काही निधीअभावी रखडल्याचे समजताच तात्काळ ५० लाख रूपयांचा निधी देण्याचे नितेश राणे यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे विकासकामांबाबत काही सूचना केल्या. प्रामुख्याने क्रीडा संकुलांच्या अत्याधुनिकरणावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले. स्व. अण्णासाहेब क्रीडासंकुल अद्ययावत करा, हे क्रीडासंकुल वातानुकूलित करा, पवन तलाव मैदानाचे आधुनिकीकरण करा, त्याठिकाणी रणजी आणि एकदिवसीय सामने आयोजित करण्याचे प्रयत्न करा, भाजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे यांच्या सल्ल्याने भाजी मंडईचा प्रश्न सोडवा, मटण-मच्छी मार्केट इमारतीचे काम लवकरात लवकर मार्गी लावा, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या उर्वरित कामाचे अंदाजपत्रक तयार करा, अशा सूचना राणे यांनी सत्ताधाऱ्यांशी बोलताना केल्या. आपण येथे राजकारण करण्यासाठी आलो नाही. चिपळूणवर आपले पहिल्यापासून प्रेम आहे. त्यामुळे सत्ता असो अथवा नसो, आपणाला काही फरक पडत नाही. चिपळूणच्या विकासकामांसाठी माझे नेहमीच योगदान राहील, अशी ग्वाही राणे यांनी दिली. पालिकेतील चांगल्या कामांसाठी आपले सहकारी तुमच्या पाठीशी सदैव राहतील, असेही राणे यांनी आवर्जून सांगितले. निधी नाही म्हणून चिंता करू नका. माझ्याकडे प्रस्ताव पाठवा. निधी मी उपलब्ध करून देईन, असे आश्वासन राणे यांनी दिले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मंगेश शिंदे, तालुकाध्यक्ष अजय साळवी, महिला जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, शहराध्यक्ष परिमल भोसले,प्रफुल्ल पिसे, वैभव वीरकर, संदेश भालेकर, अयूब खान, मांडकीचे सरपंच संतोष खैर, अभिषेक जागुष्टे, अर्जुन शिंदे, सनी मयेकर, रोहन साळवी, समीर खेडेकर, अमीर कुटरेकर, कुंदन खातू, शुभम पिसे,आकाश पवार, शौर्य निमकर आदी यावेळी उपस्थित होते.