
चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे काम कौतुकास्पद आहे. कठीण काळातही मोठ्या धाडसाने पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण यांनी पतसंस्थेचा कारभार उत्तमरित्या हाताळून व्याप्ती वाढवली आहे, अशा शब्दांत सहकारमंत्री मा. ना. बाळासाहेब पाटील यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा गौरव केला.
मा. ना. बाळासाहेब पाटील आज दुपारी चिपळूण तालुक्याच्या दौऱ्यावर होते. सावर्डे येथील कार्यक्रम आटोपून ते चिपळूणला आले आणि त्यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मा. ना. पाटील बोलत होते. ते म्हणाले, की चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांनाही सहकार्य करण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनाही या पतसंस्थेमुळे निश्चितच मोठा आधार मिळाला असेल. कोरोनाच्या काळात अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीतही पतसंस्थांचा कारभार नीट चालावा यासाठी आम्ही काही चांगले निर्णय घेतले होते. सध्या पतसंस्था काढायचे धाडस कोणी करत नाही. अशा स्थितीतही चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा कारभार उत्तमरित्या सुरू आहे. पतसंस्थेच्या ५० शाखा आहेत. व्याप्ती वाढत गेली, प्रगती होत गेली की आपले स्पर्धक निर्माण व्हायला सुरुवात होते. मात्र अशातही चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने चांगला जम बसवला आहे. संस्थापक-अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण यांनी उत्तम कारभाराद्वारे या पतसंस्थेचा विस्तार अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. बुडणाऱ्या संस्थांनाही या पतसंस्थेने सहकार्याचा हात दिला, हे कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत मा. ना. पाटील यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा गौरव केला.
यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास सांगितला. मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते यावेळी मा. ना. बाळासाहेब पाटील आणि चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार मा. शेखरसर निकम यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, माजी उपाध्यक्ष अशोकराव कदम, संचालक अशोक साबळे, गुलाबराव सुर्वे, सत्यवान म्हामुनकर, मनोहर मोहिते, राजेश वाजे, रवींद्र भोसले, सौ. स्मिता चव्हाण, ॲड. सौ. नयना पवार, तज्ज्ञ संचालक राजेंद्र पटवर्धन, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाकाळात केलेल्या मदतीबाबत सहकारमंत्र्यांनी मानले आभार!
कोरोनाच्या काळात देशासह संपूर्ण राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली होती. अशातच राज्य सरकारने मदतीचे आवाहन केले होते. त्यात पुढाकार घेऊन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने राज्य सरकारला तब्बल एक कोटी रुपयांचा धनादेश दिला, राज्याचा सहकारमंत्री या नात्याने या सेवाभावी कार्यासाठी मी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे आभार मानतो, असेही यावेळी ना. बाळासाहेब पाटील म्हणाले.