संस्थेच्या १ हजार कोटींच्या ठेवी अल्पावधीतच पूर्ण
पतसंस्थेचा आज ३० वा वर्धापनदिन तसेच सेफ लॉकर्स सुविधेचा उद्घाटन सोहळा
रत्नागिरी, प्रतिनिधी
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी दि. १९ ऑक्टोबर १९९३ रोजी संस्थेने लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यासाठी सुभाषराव चव्हाण यांचे कुशल नेतृत्व तर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांचे अचूक नियोजन तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत असलेली मेहनत यामुळेच ही पतसंस्था शिखरे पादाक्रांत करीत आहे. या पतसंस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रात ५० शाखांच्या माध्यमातून अर्थव्यवहार सुरू आहे. संस्थेने ‘आपली माणसे आपली संस्था’ या ब्रीदवाक्य प्रमाणे गरजू असो अथवा सुशिक्षित बेरोजगारांना छोटे -छोटे व्यवसाय उभे करणे, याचबरोबर शेतीपूरक दुग्ध व्यवसायाकरिता शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करून या सर्वांना स्वावलंबी करण्यात संस्थेने मोठा हातभार लावला आहे. तर दुसरीकडे या पतसंस्थेने २९ वर्षांच्या कालखंडात १ हजार कोटी ठेवींचा टप्पा पार करून अन्य वित्तीय संस्थांसमोर आदर्श ठेवला आहे. यानिमित्ताने या संस्थेचा ३० वा वर्धापन दिन व १ हजार कोटी ठेवी पूर्तता सोहळा १६ रोजी सकाळी १० वाजता सहकार भवनातील ‘सहकार सभागृहात’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त घेतलेला थोडक्यात आढावा….!
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने २९ वर्षांपूर्वी परकार कॉम्प्लेक्समध्ये छोट्याशा गाळयात पतसंस्थेचा शुभारंभ केला. या संस्थेचा कारभार आता बहाद्दूरशेख नाका येथील मुख्य प्रधान कार्यालयाबरोबरच ५० शाखांच्या माध्यमातून यशस्वीपणे सुरू आहे. संस्थेने गेल्या २९ वर्षाच्या कालखंडात आर्थिक व्यवहारातील व्यावसायिकता सांभाळीत असतानाच माणुसकीच्या ओलाव्यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे आणि आर्थिक व्यवहारापलिकडचे आपलेपणाचे नाते जोपासण्यात ही संस्था यशस्वी झाली आहे. समाजातील विविध घटकांसाठी काम करीत असताना कोणताही आपपरभाव न दाखवता सर्व समाज घटकातील गोरगरीब, आर्थिक दुर्बल, छोटे -मोठे व्यावसायिक यांना त्यांच्या आर्थिक गरजेच्यावेळी आर्थिक आधार देण्याचे काम करीत आहे. अत्यंत तत्पर व सुलभ पद्धतीने अर्थसाह्य करीत असताना कर्जमागणीदार सभासदांच्या कर्जाची निकड व गरज याची प्रत्यक्ष माहिती घेऊन विनाविलंब कर्ज उपलब्ध करून देत असताना ‘आपली माणसे आपली संस्था’ हे नाते जपण्याचा या संस्थेने कसोशीने प्रयत्न केला आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग जिद्दीने काम करीत असतात. या सर्वांची सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी सातत्याने तज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतली जाते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, स्पर्धात्मक मानसिकता तयार होण्यासाठी तसेच संघ शक्ती प्रबळ करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये शाखांतर्गत क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात व क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडते. यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गांमध्ये सांघिक भावना निर्माण झालेली पहावयास मिळते.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने स्वयंरोजगारातून रोजगार निर्मिती त्यासाठी सुलभ पद्धतीने अर्थपुरवठा करून बेरोजगारांना रोजगार देण्यात मोठा हातभार लावला आहे. ही केवळ पतसंस्था नाही तर एक वटवृक्ष झाला आहे. अनेकांच्या आधाराचा, रोजगाराचा आणि सामाजिक बांधिलकीचा ही एक आर्थिक संस्था चालवताना सुभाषराव चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी कसोशीने जपली आहे आरोग्य विषयक शिबिर असो वा नैसर्गिक आपत्ती काळात मदत असो, या संस्थेने मदतीचा हात कधीच आखडता घेतला नाही. म्हणूनच संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव व संस्थेला अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. हे सारे शक्य झाले आहे ते सुभाषराव चव्हाण यांचे कुशल नेतृत्व व स्वप्ना यादव यांचे मार्गदर्शन तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या मेहनतीच्या प्रयत्नातून यशस्वी वाटचाल सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांना बचतीची सवय व्हावी व भविष्यातील आर्थिक चणचण दूर होण्याच्या दृष्टीने संस्थेने सुमारे ३१ बचत योजना सुरू केल्या आहेत. या बचत योजनांना सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. तर गेली २३ वर्षे आपल्या सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी कोकणात नव्हे तर महाराष्ट्रात ही एकमेव पतसंस्था ठरली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या पतसंस्थेची आर्थिक स्थिती १४ ऑक्टोबर अखेर पुढीलप्रमाणे- सभासद संख्या १ लाख ३४ हजार ४४६, भाग भांडवल ६३ कोटी ९३ लाख रुपये, स्वनिधी १२८ कोटी ६० लाख, ठेवी १००१ कोटी ५९ लाख, कर्जे ७९६ कोटी ४२ लाख, पैकी प्लेज लोन ३५१ कोटी ४० लाख, पैकी सोने कर्ज ३०३ कोटी ८० लाख, गुंतवणुका ३१२ कोटी ५४ लाख, मालमत्ता ३० कोटी ८७ लाख, निव्वळ नफा मार्च २२ अखेर १८ कोटी ७६ लाख रुपये या पद्धतीने संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस असो, अथवा संस्थेचा वर्धापन दिन असो, या निमित्ताने संस्थेने ठेवींचे निश्चित केलेले उद्दिष्ट त्या-त्या वेळी पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे या संस्थेने २९ वर्षांच्या अल्प कालखंडात १ हजार कोटी ठेवींचा टप्पा पार करून अन्य वित्तीय संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
हे शिवधनुष्य पेलण्याचं काम आपण सर्वांनी केले आहे – सौ. स्वप्ना यादव
याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी म्हटले आहे की, संस्थेच्या १ हजार कोटी ठेवींच्या पूर्ततेबद्दल सर्व ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक आणि कर्मचारी यांचे प्रथम अभिनंदन, करून हे शिवधनुष्य पेलण्याचं काम आपण सर्वांनी केले आहे. १ कोटी ठेव पूर्तता होणारच होत्या. पण ज्या पद्धतीने आपण नियोजनबध्द काम केले आहे त्याला तोड नाही. दि.३० जुलै रोजी अमृतमहोत्सवी मेळाव्यात आपण जाहीर केले की, संस्थेच्या वर्धापन दिनी आपण हे उदिष्ट पूर्ण करू. त्यावेळी आपण ९४१ ठेवी पूर्ण केल्या होत्या आणि २ महिने १५ दिवस आपल्या हातात होते आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की, नेहमी प्रमाणेच आपण जे ठरवतो ते मनापासून झोकून देऊन काम पूर्ण करतो. त्या प्रमाणेच आपण २ महिने १० दिवसातच हे उदिष्ट पूर्ण केले. जी गोष्ट वर्ष वर्ष करायला लागते, ते आपण खूप सहजपणे केले आहे. हे करताना आपल्याला हुरळून जाऊन अजिबात चालणार नाही. आपली जबाबदारीपण याबरोबर वाढली आहे, या शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. त्या पुढे म्हणतात की, ज्यावेळी एवढी लोकं आपल्यावर विश्वास ठेवतात आणि एवढा उस्फुर्त प्रतिसाद देतात, त्यावेळी नक्कीच आपण अजून चांगले काम करणार आहोत आणि अजून आपली उर्जा हे करण्यासाठी वाढली आहे. आपला हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ठेव उदिष्ट पूर्ततेचा आनंद मेळावा व ३० वा वर्धापनदिन तसेच सेफ लॉकर्स सुविधेचा उद्घाटन सोहळा १६ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सहकार भावनातील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व सभासद व हितचिंतक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव याचबरोबर संचालक मंडळाने केले आहे.