
रत्नागिरी, प्रतिनिधी
चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. धो-धो असा पाऊस पडत होता. त्यामुळे चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले.महामार्गावर डीबीजे कॉलेज तसेच कापसाळ येथे पाणी तुंबल्याने वाहतूक पूर्णतः कोळमडली होती.एक ते दीड फूट पाण्यातून वाहने काढली जात होती.सलग मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एकूणच पहिल्याच पावसात चिपळूणमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.
चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पाणी
चिपळूण शहरात पुराचं पाणी आलं नसलं तरी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. अनंत आईस फेक्ट्री तसेच जिप्सी कॉर्नर जुना भैरी रस्ता,लोकमान्य टिळक वाचनालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालक व नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता.अर्धवट झालेली नाले सफाई तसेच महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे पहिल्याच पावसात शहराची ही अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.















