रत्नागिरी, (आरकेजी) : चिपळूण शहरात पकडलेल्याा केटामाईन ड्रग विक्री प्रकरणाची पाळमुळं खणायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलिसांच्या तपासामुळे अनेक धक्कादायक खुलासे आता होऊ लागले आहेत. या प्रकरणी अटक झालेल्या तीघांकडून चिपळूण पोलिसांनी आणखी पाच किलोहून जास्तीचे केटामाईन ड्रग्ज जप्त केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे ड्रग्ज पकडल्याने चिपळूण अमली पदार्थ देवाणघेवाणीच्या नकाशावर आले आहे.
लोटे एमआयडीसीतील एका कंपनीतून हे केटामाईन चोरण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जप्त झालेल्या केटामाईनची किंमत नऊ कोटी इतकी आहे.या ड्र्ग्जचा वापर रेव पार्टीसाठी केला जात असेल, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली आहे.
चिपळूण पोलिसांनी केटामाईन प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. संतोष कदम या आरोपीकडून चारच दिवसांपूर्वी पाच किलो केटामाईन जप्त केले गेले होते. त्यानंतर या प्रकणातील मुख्य सुत्रधार मंगेश कदम याला अटक झाली. मंगेशच्या घरातून आणखी पाच किलो केटामाईन जप्त करण्यात आले. मंगेशचा साथीदार असलेल्या स्वप्नील खोचरे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
मंमंगेश लोटे हा एमआयडीसीतल्या एका कंपनीत कामाला होता. तेथे कामाला असताना मंगेशने केटामाईन चोरले. सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत अनेक वेळा केटामाईनचा वापर या कंपनीत औषध निर्मीतीसाठी केला जात होता. त्यासाठी केटामाईन वापर कंपनी करत होती. याचाच फायदा मंगेशने उचलला. नोकरीला असताना कधी रिकाम्या डब्यातून तर कधी सँकमधून त्याने चोरी केली. मात्र, तब्बल दहा किलो केटामाईन कंपनीतून चोरीला गेले याची खबर कंपनी प्रशासनाला का नव्हती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कंपनी प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. कंपनीतील अधिकारी यात सहभागी आहेत का? असा संशय पोलिसांना आहे.
तीघा आरोपींची बँक खाती सुद्धा आता पोलिसांनी तपासायला सुरवात केली आहे. केटामाईन चिपळूण शहरातून इतर मोठ्या शहरात वितरित होत असल्याचा संशय पोलिसांनी आहे. त्यामुळे चिपळूण शहर हे केटामाईन पुरवण्याचे मुख्य केंद्र स्थान असल्याचं पुढे येत आहे. आता कोकणातील केटामाईन विक्रीची केंद्र शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.